कोरोनाची लस घेतल्यानंतर फक्त 0.06% लोकांना हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावे लागले - स्टडी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2021 03:13 PM2021-05-16T15:13:19+5:302021-05-16T16:36:48+5:30
vaccination : कोरोना लसीवरील (Corona Vaccine)नुकत्याच केलेल्या स्टडीमध्ये असेही समोर आले आहे की, लसीकरण करण्यात आलेले 97.38 टक्के लोक कोरोना संक्रमणापासून सुरक्षित राहिले आहेत.
नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या (Corona) दुसर्या लाटेमुळे (Second Wave) हाहाकार माजला आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या कोरोना रुग्णांची आकडेवारी भयानक आहे. कोरोनावर मात करण्यासाठी लस (Vaccine) हे सर्वात मोठे शस्त्र म्हणून पाहिले जात आहे. कोरोना लसीवरील (Corona Vaccine)नुकत्याच केलेल्या स्टडीमध्ये असेही समोर आले आहे की, लसीकरण करण्यात आलेले 97.38 टक्के लोक कोरोना संक्रमणापासून सुरक्षित राहिले आहेत. तसेच, जे लोक संक्रमित झाले आहेत, त्यापैकी केवळ 0.06 टक्के लोकांना रुग्णालयात दाखल व्हावे लागले आहे. (chances of hospitalisation after covid vaccination are 0.06 percent, says Indraprashta Apollo Hospital study)
शनिवारी इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटलने लस घेतल्यानंतर संसर्ग झालेल्या लोकांवर केलेल्या स्टडीचा निकाल समोर आला आहे. या स्टडीमध्ये असे म्हटले आहे की, कोरोना लसीकरण झालेल्या लोकांमध्ये संक्रमणाची शक्यता खूपच कमी होती आणि ज्यांना संसर्ग झाला त्यांना आयसीयूमध्ये दाखल केले गेले नाही किंवा त्यांचा मृत्यू झाला नाही. नवी दिल्ली येथील इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटलने ही स्टडी अशा आरोग्य कर्मचाऱ्यांवर केली आहे की, ज्यांना कोव्हिशिल्ड लस देण्याआधी 100 दिवसांत कोविडची लक्षणे आढळली.
"भारतात लसीकरण मोहिमेदरम्यान कोरोनाच्या दुसर्या लाटेत रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. लसीकरणानंतरही काही लोकांना संसर्ग होत आहे. ज्याला ब्रेकथ्रू संक्रमण असे म्हणतात. हे संक्रमण काही व्यक्तींमध्ये अंशतः आणि संपूर्ण लसीकरणानंतर उद्भवू शकते", असे अपोलो हॉस्पिटल्स ग्रुपचे ग्रुप मेडिकल डायरेक्टर डॉ अनुपम सिब्बल यांनी वृत्तसंस्था 'एएनआय'ला सांगितले.
ही स्टडी 3235 आरोग्य कर्मचार्यांवर करण्यात आली. स्टडीनुसार असे आढळले आहे की, यापैकी 85 आरोग्य कर्मचार्यांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी 65 कर्मचार्यांना (2.62%) लसीचे दोन्ही डोस दिले गेले, तर 20 (2.65%) लोकांला लसीचा फक्त एकच डोस मिळाला. यादरम्यान, महिलांवर व्हायरसचा जास्त परिणाम दिसून आला. विशेष म्हणजे, वृद्ध किंवा लहान वयातील संसर्गावर कोणताही फरक पडला नाही.