कर्नाटक निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये बंडखोरीची शक्यता; माजी मुख्यमंत्री पक्षावर नाराज
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2023 10:57 PM2023-04-11T22:57:24+5:302023-04-11T22:58:40+5:30
जगदीश शेट्टर हे हुबळीचे आमदार आहेत. त्यांनी यापूर्वी सहा वेळा विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला आहे. गेल्या 2018 च्या विधानसभा निवडणुकीत शेट्टार यांनी 21,000 मतांच्या फरकाने विजय मिळवला.
कर्नाटकात विधानसभा निवडणुकीचे बिगूल वाजले आहे. भाजप हा गड जिंकण्यासाठी कंबर कसून तयारीला लागला आहे. मात्र, आता येथील विधानसभा निवडणुकीला महिनाभरापेक्षाही कमी कालावधी उरला असताना, पक्षात मोठी बंडखोरी होण्याची शक्यता आहे. येथील सहा वेळचे भाजप आमदार तथा माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टार यांनी पक्षाचा निर्णय मान्य करण्यास नकार दिला आहे. पक्षनेतृत्वाने आपल्याला तिकीट देणार नसल्याचे म्हटले असून इतरांसाठी मार्ग प्रशस्त करण्यास सांगितले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. शेट्टार हे 2012 मध्ये कर्नाटकचे मुख्यमंत्री होते. महत्वाचे म्हणजे, कर्नाटक निवडणुकीसाठी भाजपने आपली 189 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून यात जगदीश शेट्टार यांचे नाव नाही.
सहा वेळा जिंकली आहे विधानसभा निवडणूक -
जगदीश शेट्टर हे हुबळीचे आमदार आहेत. त्यांनी यापूर्वी सहा वेळा विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला आहे. गेल्या 2018 च्या विधानसभा निवडणुकीत शेट्टार यांनी 21,000 मतांच्या फरकाने विजय मिळवला. यावेळी त्यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे महेश नलवाड यांचा पराभव केला होता. पत्रकारांशी बोलताना शेट्टर म्हणाले, गेल्या सहा निवडणुकांमध्ये आपण सातत्याने विजयी होत आलो आहोत आणि प्रत्येक वेळी आपल्या विजयातील अंतर 21,000 मतांपेक्षाही अधिक राहिले आहे. मग माझ्यात कमी काय आहे?
माझी चूक काय? -
जगदीश शेट्टार म्हणाले, माझी राजकीय कारकीर्द पूर्णपणे स्थिर आहे. मला यावेळीही निवडणूक लढू द्यावी अशी विनंती आपण पक्ष नेतृत्वाकडे केली आहे. शेट्टर म्हणाले, मला केवळ एकच विचारायचे आहे की, मी सहा वेळा विजयी झालो आहे. माझ्या राजकीय जीवनात मी कधीही झटके खाल्लेले नाहीत आणि माझ्यावर कुठल्याही प्रकारचा आरोप नाही. मग मला बाजूला का केले जात आहे? एवढेच नाही, तर पक्षाने मला एकदा निवडणूक लढवण्याची परवानगी द्यावी, अन्यथा पक्षासाठी बरे होणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. मात्र, तिकीट न मिळाल्यास अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार की नाही, हे त्यांनी स्पष्ट केले नाही. पण ते बंडखोरीच्या मनस्थितीत दिसत होते.