काका-पुतण्यात समेटाची शक्यता, अमित शहांची मध्यस्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2022 11:13 AM2022-11-22T11:13:51+5:302022-11-22T11:15:17+5:30
‘चिराग पासवान भाजप नेतृत्वाखालील एनडीएत येणार असतील तर आपल्याला कोणतीही अडचण नाही, परंतु त्यांनी २०२० मध्ये एकट्याने निवडणूक लढविण्याच्या निर्णयाबद्दल माफी मागायला हवी,’ असे म्हणत पारस यांनी आपल्याशिवाय हे शक्य नाही, असेच सुचविले आहे.
विभाष झा -
पाटणा : महाराष्ट्राप्रमाणेच बिहारच्याराजकारणातही काका-पुतणे हा शब्द खूप लोकप्रिय आहे. लोक मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांना काका-पुतण्याची जोडी समजतात, पण खऱ्या आयुष्यात काका-पुतण्या म्हणजे लोजपचे प्रमुख चिराग रामविलास पासवान आणि केंद्रीय मंत्री पशुपती कुमार पारस ही काका-पुतण्याची जोडी प्रसिद्ध आहे. ‘चिराग पासवान भाजप नेतृत्वाखालील एनडीएत येणार असतील तर आपल्याला कोणतीही अडचण नाही, परंतु त्यांनी २०२० मध्ये एकट्याने निवडणूक लढविण्याच्या निर्णयाबद्दल माफी मागायला हवी,’ असे म्हणत पारस यांनी आपल्याशिवाय हे शक्य नाही, असेच सुचविले आहे.
अमित शहांची मध्यस्ती -
मतांचे विभाजन टाळून महाविकास आघाडीला पराभूत करण्यासाठी दोन्ही पक्षांनी एकत्र यावे असे भाजपला वाटते. त्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मध्यस्थी करत आहेत. २०२०च्या निवडणुकीत जदयू आणि भाजप एकत्र होते तेव्हाही चिराग यांनी विरोधात आपले उमेदवार उभे केले होते. भाजपशी थेट संबंध नसताना ते कुठेतरी भाजपच्या सूचनांवर काम करत आहेत, असे त्यावरून म्हटले जात होते.