विवाहसोहळ्यांमधील उधळपट्टीला बसणार चाप, पाहुणे आणि जेवणावर बंधनं
By admin | Published: February 16, 2017 10:03 AM2017-02-16T10:03:08+5:302017-02-16T10:06:46+5:30
विवाहसोहळ्यांमध्ये आपलं आर्थिक आणि सामाजिक स्थान दाखवण्यासाठी पाण्यासारखा पैसा वाहत करण्यात येणा-या उधळपट्टीवर नियंत्रण आणण्यासाठी लोकसभेत विधेयक मांडण्यात येणार आहे
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 16 - विवाहसोहळ्यांमध्ये आपलं आर्थिक आणि सामाजिक स्थान दाखवण्यासाठी पाण्यासारखा पैसा वाहत करण्यात येणा-या उधळपट्टीवर नियंत्रण आणण्यासाठी लोकसभेत विधेयक मांडण्यात येणार आहे. पैशांच्या उधळपट्टीसोबतच विवाहसोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात येणा-या अमर्यादित पाहुणे आणि जेवणावर बंधन आणण्यासंबंधीही विधेयकात नमूद करण्यात आलं आहे. जे लोक विवाहसोहळ्यात पाच लाखाहून अधिक खर्च करतात त्यांनी गरिब कुटुंबातील मुलींच्या लग्नात हातभार लावावा अशी तरतूद या विधेयकात करण्यात आली आहे.
लोकसभेतील काँग्रेस खासदार रंजीत रंजन हे खासगी विधेयक सादर करणार आहेत. 'जर एखादं कुटुंब विवाहसोहळ्यात पाच लाखांहून अधिक रक्कम खर्च करत असेल, तर त्यांनी खर्चाच्या 10 टक्के रक्कम गरिब कुटुंबातील मुलींच्या लग्नात मदत म्हणून दिली पाहिजे', असं रंजीत रंजन यांनी विधेयकात म्हटलं आहे.
लोकसभेच्या आगामी अधिवेशनात विवाह विधेयक 2016 हे खासगी विधेयकाच्या स्वरुपात मांडलं जाणार आहे. 'उधळपट्टी थांबवावी आणि साध्या विवाहपद्धतीला प्रोत्साहन मिळावं हा या विधेयकामागचा उद्देश असल्याचं', रंजीत रंजन यांनी सांगितलं आहे. 'लग्न दोन लोकांच्या पवित्र नात्याची सुरुवात असते. अशावेळी साधेपणाला महत्व दिलं गेलं पाहिजे. पण आपल्याकडे विवाहसोहळ्यांमध्ये देखावा आणि उधळपट्टी वाढली आहे', असं रंजीत रंजन बोलल्या आहेत.