चंदन गुप्ता हत्येप्रकरणी मुख्य आरोपीला अटक, दोघांचा शोध सुरू; तणाव कायम, सुरक्षेत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2018 01:59 AM2018-02-01T01:59:47+5:302018-02-01T02:00:46+5:30
कासगंजमध्ये झालेल्या चंदन गुप्ता (२२) या महाविद्यालयीन युवकाच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सलीम याला बुधवारी अटक करण्यात आली. सलीमचे वय ३० च्या आत असून त्याचे दोन भाऊ नसीम आणि वसीम हेदेखील या खून प्रकरणात आरोपी आहेत. ते दोघेही फरार आहेत. गुप्ताच्या हत्येनंतर हिंसाचार उसळला होता.
लखनौ : कासगंजमध्ये झालेल्या चंदन गुप्ता (२२) या महाविद्यालयीन युवकाच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सलीम याला बुधवारी अटक करण्यात आली. सलीमचे वय ३० च्या आत असून त्याचे दोन भाऊ नसीम आणि वसीम हेदेखील या खून प्रकरणात आरोपी आहेत. ते दोघेही फरार आहेत. गुप्ताच्या हत्येनंतर हिंसाचार उसळला होता.
गुप्ता याच्यावर गोळी झाडल्याची कबुली सलीमने दिल्याचा दावा पोलिसांनी केला. कासगंजच्या काही भागांत अजूनही तणाव आहे. २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन साजरा करण्याच्या हेतुने युवकांनी मोटारसायकल फेरी काढली होती. या फेरीवर झालेल्या दगडफेकीनंतर दोन गटांत चकमक उडाली. यात बंदुकीची गोळी लागून चंदन गुप्ता याचा मृत्यू झाला. तीन दुकाने, दोन बसगाड्या व कार पेटवून दिली गेली. हिंसाचार प्रकरणी १५० जणांना अटक करण्यात आली. कासगंजच्या संवदेनशील भागांत सुरक्षा कर्मचाºयांची गस्त वाढवण्यात आली आहे. कासगंजमध्ये मंगळवारी हिंसाचाराचे तुरळक प्रकार घडले तरी बुधवारी एकूण परिस्थिती शांततेची आहे. घडलेला हिंसाचार आणि त्याला आवर घालण्यासाठी उचलण्यात आलेल्या पावलांबद्दल केंद्र सरकारने मागवलेला अहवाल राज्य सरकार तयार करीत आहे. गुन्हेगारांना शिक्षा व्हावी, यासाठी उचलण्यात आलेल्या पावलांचा तपशीलही केंद्रीय गृहमंत्रालयाला पाठवला जाईल, असे अधिकारी म्हणाला.
पहिला गोळीबार रॅलीतून?
त्या रॅलीत सहभागी झालेल्या काही युवकांनी मुस्लीम वस्तीत येताच गोळ्या झाडल्याचे चित्रिकरण समोर आले असून, पोलीस ते तपासत आहेत. तहसील कार्यालयावरून हे चित्रिकरण केले गेले आहे. त्या रॅलीत सहभागी झालेल्या काही तरुणांच्या हातात लाठ्या व दंडुके असल्याचेही चित्रित झाले आहे. (वृत्तसंस्था)
काँग्रेसच्या शिष्टमंडळाला अडविले
आरोपींच्या घरांवर मालमत्ता जप्त करण्याच्या चिकटवण्यात आल्या आहेत. कासगंज जिल्ह्याच्या सीमेवरील इटा जिल्ह्याच्यामधील मिरहाची भागात प्रवेश करण्यापासून काँग्रेसच्या शिष्टमंडळाला अडवण्यात आले. कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्यावरून तणावग्रस्त भागांत जाण्यापासून शिष्टमंडळाला रोखल्याचे सूत्रांनी सांगितले. कासगंजचे जिल्हादंडाधिकारी आर. पी. सिंह यांनी या शिष्टमंडळाला ते तणावग्रस्त भागात गेल्यास आणखी प्रश्न निर्माण होतील, या कारणास्तव परवानगी नाकारली.