सिद्धूची पाकिस्तानसाठी 'बॅटिंग'; म्हणे, काही लोकांच्या कृत्यासाठी देशाला ठरवू नका दोषी!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2019 05:31 PM2019-02-15T17:31:18+5:302019-02-15T17:38:03+5:30
पुलवाम्यातील दहशतवादी हल्ल्यात भारतामातेच्या 38 शहीद पुत्रांना वीरमरण आलं.
चंदीगड- पुलवाम्यातील दहशतवादी हल्ल्यात भारतामातेच्या 38 शहीद पुत्रांना वीरमरण आलं. पुलवाम्यातील या आत्मघातकी हल्ल्यानंतर पंजाब आणि काँग्रेसमधलं राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघालं आहे. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग आणि त्यांच्या कॅबिनेटमधील मंत्री नवज्योत सिंग सिद्धू यांनी परस्पर विरोधी विधानं केली आहेत. सिद्धू म्हणाले, दोन्ही देशांमध्ये शांती प्रस्थापित होणं गरजेचं आहे. काही लोकांच्या कृत्यासाठी एखाद्या देशाला दोषी ठरवू शकत नाही. तर पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी पुलवामा हल्ल्यातील दहशतवाद्यांवर कठोरातली कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. आता पाकिस्तानबरोबर चर्चा नव्हे, तर कारवाई करण्याची गरज आहे, असं मत अमरिंदर यांनी व्यक्त केली आहे.
पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री असलेल्या नवज्योत सिंग सिद्धू यांच्या विधानांत मतभिन्नता आहे. त्यामुळे पंजाब काँग्रेसमध्ये वाद निर्माण झाला आहे. करतारपूर का बंद करण्यात आलं. करतारपूरशी लोकांच्या भावना जोडलेल्या आहेत. जेव्हा एखादी व्यक्ती भाविक म्हणून येते तेव्हा ती वेगळी असते. तसेच या समस्यांचं मुळापर्यंत जाऊन त्या संपवल्या पाहिजेत, असं मला वाटत असल्याचं सिद्धूनं सांगितलं आहे.
Punjab Min Navjot Singh Sidhu: What has this bloodshed got to do with Kartarpur? It connects-people, hearts. When a person becomes a pilgrim out of devotion,he becomes a different person. What I feel is we should deliberate over this, find the root cause of the problem&uproot it. pic.twitter.com/dgrzPwuyRj
— ANI (@ANI) February 15, 2019
सीआरपीएफच्या वाहनावरील हल्ल्यात 38 जवान शहीद झाल्याचे वृत्त समजताच देशभर संतापाची लाट उसळली आहे. या हल्ल्यानंतर तरी भारताने पाकिस्तानला कायमस्वरूपी अद्दल घडवावी, अशी मागणी सर्व स्तरांतून होत आहे. सर्व राजकीय नेत्यांनीही या भेकड हल्ल्याचा निषेध केला असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जवानांचे हे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही, असे म्हटले आहे. त्यामुळे भारतही काही जोरदार प्रत्युत्तर देईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. संपूर्ण भारत जवानांच्या मागे ठामपणे उभा आहे, असे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटले आहे.
काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनीही दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आहे. जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला, ओमर अब्दुल्ला, मेहबुबा मुफ्ती, राज्यपाल सत्यपाल मलिक तसेच माजी संरक्षणमंत्री शरद पवार व मुलायम सिंह यादव, योगी आदित्यनाथ यांनीही हल्ल्याचा धिक्कार केला आहे. भारताने सर्जिकल स्ट्राइक केला. पण त्यातून पाकला धडा मिळाल्याचे दिसत नाही. त्यामुळे आता कायमस्वरूपी अद्दल घडविण्याची वेळ आली आहे. स्व. इंदिरा गांधी यांनी १९७१ साली एक घाव घालून पाकचे जे दोन तुकडे केले होते, तशीच कारवाई भारताने करायला हवी, अशीच चर्चा सुरू आहे.