Chandigarh electricity crisis: गेल्या 36 तासांपासून चंदीगड अंधारात; सरकारने मदतीसाठी बोलवावी आर्मी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2022 07:01 PM2022-02-23T19:01:54+5:302022-02-23T19:02:35+5:30
Chandigarh electricity crisis: विद्युत विभागाच्या खासगीकरणाविरोधात कर्मचारी सोमवारी मध्यरात्रीपासून 72 तासांच्या संपावर गेल्यामुळे संपूर्ण शहराचा वीजपुरवठा ठप्प झाला आहे. विजेअभावी नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
खासगीकरणाविरोधात पंजाबच्यावीज विभागाचे कर्मचारी संपावर गेले आहेत. त्यामुळे चंदीगडमध्ये आलेले वीज संकट सोडवण्यासाठी सरकारने लष्कराची मदत घेतली आहे. वीज पुरवठा सुरळीत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, अभियंत्यांसह भारतीय लष्कराचे 100 हून अधिक सैनिक या कामात सामील झाले आहेत. सुमारे 80पॉवर स्टेशन पूर्ववत करण्यात आल्याचे भारतीय लष्कराचे म्हणणे आहे. वीज व्यवस्था पूर्ववत करण्यासाठी लष्कराने दिल्ली, जालंधर आणि इतर ठिकाणांहून पथकांना पाचारण केले आहे.
36 तासांपासून शहर अंधारात
जम्मूनंतर ही दुसरी वेळ आहे, जेव्हा अशा परिस्थितीत लष्कराला पुढे यावे लागले आहे. 21 फेब्रुवारी रोजी विद्युत विभागाच्या खासगीकरणाविरोधात वीज कर्मचारी अचानक संपावर गेले होते. त्यामुळे चंदीगड अंधारात गेले. संपूर्ण शहरात 36 तासांहून अधिक काळ वीज नव्हती. विजेअभावी नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. यानंतर चंदीगडच्या लेफ्टनंट गव्हर्नर यांनी लष्कराला वीज व्यवस्था पूर्ववत करण्याची विनंती केली.
खासगीरकरणाचा विरोध
सोमवारी अचानक वीज कर्मचारी 72 तासांच्या संपावर गेले. केंद्र सरकारने चंदीगडच्या वीज विभागाच्या खासगीकरणाची फाईल क्लिअर करून वीजेचे काम खासगी कंपनीला देण्याच्या विरोधात वीज कर्मचाऱ्यांचा हा संप आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशाकडे दुर्लक्ष करून प्रशासनाने वीज विभागाचे खासगीकरण केल्याचा आरोप युनियनने केला आहे. हा निर्णय मागे घेण्याची मागणी कर्मचाऱ्यांकडून होत आहे.
अनेक भागात पाणीटंचाई
वीज कर्मचाऱ्यांच्या संपामुळे बहुतांश भागात मध्यरात्रीच वीज गेली आणि मंगळवारपर्यंत आली नाही. विजेअभावी अनेक भागात नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागला. वीजपुरवठा न झाल्यामुळे घरुन काम करणाऱ्या लोकांना मोठा त्रास सहन करावा लागला. दिवसभर वीज नसल्याने मुलांच्या ऑनलाइन क्लासेसवरही परिणाम झाला. सध्या विद्यापीठ आणि महाविद्यालयांच्या परीक्षा सुरू आहेत. वीजपुरवठा खंडित झाल्याने परीक्षांवरही परिणाम झाला आहे.