चंदीगड महापौर निवडणूक घोटाळ्यावर मोठा निर्णय; पुन्हा मतमोजणी, ती ८ मते पात्र धरणार...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2024 03:19 PM2024-02-20T15:19:21+5:302024-02-20T15:19:37+5:30
सोमवारी झालेल्या सुनावणीमध्ये या अधिकाऱ्याने बॅलेट पेपरवर क्रॉस करून मते बाद ठरविल्याचे कबुल केले होते.
चंदीगड महापालिकेच्या महापौर निवडणुकीत निवडणूक अधिकाऱ्याने आप व काँग्रेसची मते अपात्र ठरवत मोठी अफरातफर केली होती. यामुळे भाजपाचा उमेदवार जिंकला होता. याचा व्हिडीओ समोर येताच सर्वोच्च न्यायालयाने या निवडणूक अधिकाऱ्याला झापले होते. या प्रकरणी आता मोठा निर्णय आला आहे.
चंदीगड महापौर मतमोजणीतील अफरातफरीवर आज सर्वोच्च न्यायालयात निर्णायक सुनावणी सुरु आहे. सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने महत्वाचा निर्णय दिला आहे. महापौर निवडणुकीच्या मतांची पुन्हा मोजणी केली जावी. तसेच जी ८ मते निवडणूक अधिकाऱ्याने क्रॉस चिन्ह काढून अवैध ठरविली होती ती वैध धरण्यात यावीत असे खंडपीठाने निर्देश दिले आहेत.
सोमवारी झालेल्या सुनावणीमध्ये या अधिकाऱ्याने बॅलेट पेपरवर क्रॉस करून मते बाद ठरविल्याचे कबुल केले होते. त्याला असे करताना तुम्ही कॅमेराकडे का पाहत होता, असे विचारले असता त्यांनी कॅमेराच्या दिशेने खूप आवाज येत होता, म्हणून मी तिकडे पाहत होतो, असे सांगितले आहे. मतांवर क्रॉस कोणत्या अधिकारातून केले, असे विचारले असता या अधिकाऱ्याने मी आठ मतांवर क्रॉस चिन्ह लिहिले होते. आम आदमी पक्षाच्या महापौर उमेदवाराने येऊन मतपत्रिका हिसकावून फाडून पळ काढला, असे उत्तर दिले होते.