आईचा मृतदेह घेण्यास पोटच्या मुलांकडून नकार, मुस्लिम कुटुंबानं केले शीख महिलेवर अंत्यसंस्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2020 08:45 AM2020-02-18T08:45:39+5:302020-02-18T08:51:17+5:30
मुस्लिम कुटुंबीयांच्या या पावलाचं सर्वच स्तरातून कौतुक केलं जात आहे.
चंदीगडः पंजाबच्या बठिंडामध्ये एका मुस्लिम कुटुंबीयांनी शीख महिलेवर अंत्यसंस्कार करून एक अनोखं उदाहरण समोर ठेवलं आहे. त्या शीख महिलेच्या मुला-मुलींसह कुटुंबीयांनी मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला होता, त्यानंतर शेजारी राहणाऱ्या मुस्लिम कुटुंबानं अंत्यविधींसह तिच्यावर अंत्यसंस्कार केले. मुस्लिम कुटुंबीयांच्या या पावलाचं सर्वच स्तरातून कौतुक केलं जात आहे.
मलेरकोटला भागात ही घटना घडली असून, महिलेची ओळख दलप्रीत कौर या नावानं झाली आहे. ती घरगुती कामं करायची. गेल्या काही दिवसांपूर्वी ती तीर्थयात्रेला गेली होती, तेव्हा ती आजारी पडली. सोमवारी तिचा मृत्यू झाला. दलप्रीत कौरचे अंतिम संस्कार करणाऱ्या कुटुंबीयांमधले मोहम्मद अस्लम म्हणाले, आम्ही त्यांना राणी काकी असे संबोधत होतो. त्या एका भाड्याच्या घरात एकट्याच राहत होत्या. त्यांच्या मृत्यूपूर्वी त्यांच्या कुटुंबीयांसंदर्भात कोणतीच माहिती नव्हती. त्यांची आई आणि भाऊ कॅनडामध्ये राहतात. त्यांचं सासर हे संगरुर जिल्ह्यातील झुंडा गावात वास्तव्याला असल्याचं सांगितलं जातं. राणी काकीचं माहेर आणि सासर ही दोन्ही कुटुंब आर्थिकदृष्ट्या संपन्न आहेत.
अस्लम पुढे सांगतात, राणी काकीच्या मृत्यूनंतर त्यांच्या मोबाइलवरून आम्हाला त्यांच्या मुला-मुलींचा नंबर मिळाला. त्या दोघांनाही राणी काकीच्या मृत्यू बातमी सांगितली, त्यावेळी त्यांनी मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला. मुलाकडून समजलं की राणी काकीचं 1999ला घटस्फोट झाला होता, त्यानंतर ती एकटीच राहत होती. इतक्या वर्षात आम्हाला त्यांच्या कुटुंबीयांसंदर्भात कोणतीही माहिती मिळालेली नाही. जेव्हा कुटुंबीयांनी इथे येण्यास नकार दिला, तेव्हा आम्हीच तिच्यावर अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला. मुस्लीम कुटुंबीयांनी शीख परंपरेनं राणी काकीवर अंत्यसंस्कार केले आहेत. गुरुद्वारेत आता श्राद्ध आणि इतर विधी केले जाणार असल्याचीही माहिती पोलिसांनी दिली आहे.