Chandipura Virus : सावधान! कोरोनापेक्षाही धोकादायक आहे चांदीपुरा व्हायरस?; WHO ने दिला गंभीर इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2024 14:06 IST2024-08-30T14:00:41+5:302024-08-30T14:06:06+5:30
Chandipura Virus : चांदीपुरा व्हायरस भारतातील अनेक राज्यांमध्ये वेगाने पसरत आहे. आता त्याचा मृत्यूदर ३३ टक्क्यांवर पोहोचला आहे, ही अत्यंत चिंतेची बाब आहे

Chandipura Virus : सावधान! कोरोनापेक्षाही धोकादायक आहे चांदीपुरा व्हायरस?; WHO ने दिला गंभीर इशारा
चांदीपुरा व्हायरस भारतातील अनेक राज्यांमध्ये वेगाने पसरत आहे. आता त्याचा मृत्यूदर ३३ टक्क्यांवर पोहोचला आहे, ही अत्यंत चिंतेची बाब आहे. गेल्या २० वर्षांत भारतात हा धोकादायक आजार झपाट्याने वाढल्याचं WHO ने मान्य केलं आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आत्तापर्यंत चांदीपुरा व्हायरलची २४५ प्रकरणं भारतात नोंदवली गेली आहेत. गेल्या २० वर्षांतील हा उच्चांक आहे.
'वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन'नुसार, जूनच्या सुरुवातीपासून ते १५ ऑगस्टपर्यंत ८२ मृत्यू झाले आहेत. चांदीपुरा व्हायरसचा पुढील प्रसार रोखण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने वेक्टर नियंत्रण आणि माश्या, डास आणि टिक्स यांच्यापासून बचाव करण्याची शिफारस केली आहे. १५ ऑगस्ट दरम्यान, आरोग्य मंत्रालयाने AES (एक्यूट इंसेफेलाइटिस सिंड्रोम) ची २४५ प्रकरणं नोंदवली. ज्यामध्ये ८२ मृत्यूंचा समावेश आहे. ६४ प्रकरणं चांदीपुरा व्हायरसची आहेत.
WHO ने दिला इशारा
WHO ने म्हटलं आहे की, चांदीपुरातील व्हायरस आधीच कमी होत आहेत. मात्र याबाबत सतर्क राहण्याची गरज आहे. कारण पाऊस पडल्यानंतर डास आणि माशांमुळे रोगराईचा धोका वाढतो. कारण त्यामुळे त्याचा प्रसार झपाट्याने होतो. बाधित लोकांचे नमुने घेतले जातात. या आजाराची वेळीच ओळख झाली तर मृतांची संख्या कमी होऊ शकते.
चांदीपुरा व्हायरसची लक्षणं
चांदीपुरा व्हायरसची लागण झालेल्या मुलांना अचानक जास्त ताप, उलट्या, जुलाब, चक्कर येणे, डोकेदुखी, मेंदूला सूज येणं यासारखी लक्षणं दिसतात, ज्यामुळे त्यांचा मृत्यू होऊ शकतो. या व्हायरसची लागण झालेली मुलं लक्षणं दिसल्यानंतर ४८-७२ तासांच्या आत मरतात. अशा परिस्थितीत हा व्हायरस लहान मुलांसाठी आणि मोठ्यांसाठी घातक मानला जातो.