मोदी सरकारमधील सर्वात श्रीमंत मंत्री; चंद्रशेखर पेम्मासानी यांची संपत्ती वाचून व्हाल धक्क!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2024 10:41 AM2024-06-10T10:41:54+5:302024-06-10T10:41:54+5:30
Chandra Sekhar Pemmasani : नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळातील चंद्रशेखर पेम्मासानी हे सर्वात श्रीमंत मंत्री आहेत.
नवी दिल्ली : मोदी सरकार ३.० मध्ये अनेक नवीन आणि तरुण खासदारांना कॅबिनेट मंत्री बनवण्यात आले आहे. विशेषत: मित्रपक्षांबद्दल बोलायचे झाल्यास, तेलगू देसम पक्षाच्या कोट्यातून ३६ वर्षीय राममोहन नायडू यांची कॅबिनेट मंत्री म्हणून नियुक्ती करण्याता आली आहे. तर, तेलुगु देसम पक्षाचे चंद्रशेखर पेम्मासानी यांना राज्यमंत्री करण्यात आले आहे. नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळातील चंद्रशेखर पेम्मासानी हे सर्वात श्रीमंत मंत्री आहेत.
चंद्रशेखर पेम्मासानी हे आंध्रप्रदेशच्या गुटूंर लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. त्यांनी ३ लाख ४० हजार मतांच्या फरकाने विरोधी उमेदवाराला धूळ चारली. चंद्रशेखर पेम्मासानी हे ५ हजार ७०० कोटी रुपयांचे मालक आहेत. चंद्रशेखर पेम्मासानी यांची ही पहिलीच निवडणूक आहे. तर, राममोहन नायडू हे आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम येथून लोकसभेचे खासदार आहेत. राममोहन नायडू हे तेलुगु देसम पक्षाचे सरचिटणीस असून पक्षाचे ज्येष्ठ नेते येरेन नायडू यांचे पुत्र आहेत.
दरम्यान,आंध्रप्रदेशच्या गुटूंरच्या बुर्लिपलेम गावात जन्माला आलेले चंद्रशेखर पेम्मासानी यांनी उस्मानिया विद्यापिठातून एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले आहे. शिक्षण पूर्ण केल्यानंतर जॉन्स हॉपकिन्स विद्यापिठाच्या रुग्णालयात ५ वर्ष काम केले. त्यांनी विद्यापिठातील विद्यार्थ्यांना शिकवण्याचेही काम केले. चंद्रशेखर पेम्मासानी हे एक ऑनलाइन लर्निंग प्लॅटफॉर्म यूवर्ल्डचे संस्थापक आणि सीईओ आहेत. तसेच, चंद्रशेखर पेम्मासानी हे टीडीपीच्या एनआरआय सेलच्या दिर्घकाळापासून सक्रिय होते.
जीतन राम मांझी हे सर्वात ज्येष्ठ मंत्री
३७ वर्षीय रक्षा निखिल खडसे या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील सर्वात तरुण महिल्या मंत्री ठरल्या आहेत, तर ७९ वर्षीय जीतन राम मांझी हे सर्वात वयस्कर मंत्री ठरले आहेत. रक्षा खडसे यांनी मोदींच्या नवीन मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली. महाराष्ट्रातील रावेर लोकसभा मतदारसंघातून त्या विजयी झाल्या आहेत. दरम्यान, ७९ वर्षीय मांझी यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. मांझी हे बिहारचे मुख्यमंत्री होते आणि ते हिंदुस्थानी अवाम मोर्चा (HAM) चे संस्थापक अध्यक्ष आहेत. यापूर्वी ते नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीचे कल्याण मंत्री होते. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत ते गया मतदारसंघातून विजयी झाले आहेत.