कपाळावर चंदनाची टिकली लावली म्हणून मुलीला मदरशातून हाकलले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2018 02:19 PM2018-07-09T14:19:42+5:302018-07-09T14:19:54+5:30
केरळमधील एका मुस्लीम मुलीला मदरशातून हाकलून देण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. मदरशामध्ये येताना या मुलीने चंदनाची टिकली कपाळावर लावली होती.
कोची - केरळमधील एका मुस्लीम मुलीला मदरशातून हाकलून देण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. मदरशामध्ये येताना या मुलीने चंदनाची टिकली कपाळावर लावली होती. संबंधित मुलीच्या वडिलांनी ही संपूर्ण घटना आपल्या फेसबुक अकाऊंटवरुन शेअर केली आहे. त्यानंतर ही फेसबुक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली असून त्यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
केरळमधील इयत्ता 5 वीमध्ये शिकणाऱ्या हिनाने एका शॉर्टफिल्मध्ये अभिनय केला. त्यासाठी तिने आपल्या कपाळावर चंदनाची टिकली लावली होती. शाळेतील अभ्यासासह हिना खेळ आणि सांस्कृतिक कार्यक्रमातही सहभागी होत असल्याचे हिनाचे वडिल उमर मलयिल यांनी फेसबुकवरील पोस्टमध्ये म्हटले आहे. माझ्या मुलीने एका शॉर्टफिल्मध्ये अभिनय करण्यासाठी कपाळावर टिकली लावली होती. त्यामुळेच तिला मदरशातून बाहेर काढण्यात आल्याचे तिच्या वडिलांनी फेसबुकवर म्हटले. मल्याळम भाषेतील या पोस्टला हजारो लाईक्स आणि शेअर मिळाले आहेत. तर अनेकांनी कमेंटमधून संमिश्र प्रतिक्रिया दिल्या. या पोस्टमुळे उमर यांच्यावर टीका करण्यात येत असून त्यांना अनेकांनी नास्तिक संबोधले आहे. मात्र, मी 100 टक्के आस्तिक असून इस्लामिक मुल्ल्यांचा आदर करतो. हा वैश्विक मुद्दा नसून विनाकारण धर्माला वाईट बनविण्याचा कुणीही प्रयत्न करु नये, असे आवाहनही उमर यांनी फेसबुकवरील दुसऱ्या पोस्टमधून म्हटले आहे.