आंध्र प्रदेश व ओडिशात पुन्हा येणार चंद्राबाबू आणि नवीनबाबूंचे सरकार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 05:11 AM2019-05-21T05:11:54+5:302019-05-21T05:12:00+5:30
राज्यात सत्ता मिळणार; पण लोकसभेत मात्र फटका
अमरावती : आंध्र प्रदेशमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांत विजय मिळवून मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू कदाचित पुन्हा मुख्यमंत्री बनू शकतील. मात्र, केंद्र सरकारच्या स्थापनेत किंगमेकर बनण्याचे त्यांचे स्वप्न कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी जगनमोहन रेड्डी यांच्यामुळे भंग पावण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकांत राज्यामध्ये वायएसआर काँग्रेस पक्षाला तेलुगू देसम पक्षापेक्षा (टीडीपी) जास्त जागा मिळतील, असा निष्कर्ष एक्झिट पोलनी व्यक्त केला आहे.
लगडपती राजा गोपाल सर्वेक्षणातून असा निष्कर्ष आला की, आंध्र प्रदेशच्या विधानसभा निवडणुकांत टीडीपीला ९० ते ११० जागा मिळतील. वायएसआर काँग्रेसला ६५ ते ७९ व अन्य पक्षांना १ ते ५ जागा मिळतील. आरजी फ्लॅश पोलमध्येही टीडीपीचेच सरकार पुन्हा राज्यात सत्तेवर येणार असे म्हटले
आहे.
न्यूज १८-आयपीएसओएसच्या पोलने म्हटले आहे की, वायएसआर काँग्रेसला १३ तर टीडीपीला ११ लोकसभेच्या जागा मिळतील. रिपब्लिक-सी व्होटरच्या पोलचा निष्कर्ष आहे की, टीडीपीला १४ तर वायएसआर काँग्रेसला ११ लोकसभेच्या जागा मिळतील. एनडीए, यूपीएला आंध्र प्रदेशमध्ये एकही जागा जिंकता येणार नाही. चाणक्य-न्यूज२४ ने टीडीपीला १७ तर वायएसआर काँग्रेसला ८ लोकसभेच्या जागा मिळतील, असे भाकीत केले
आहे. (वृत्तसंस्था)
स्पष्ट बहुमताचा अंदाज
भुवनेश्वर : ओडिशामध्ये बिजू जनता दलाचे (बिजद) प्रमुख व मुख्यमंत्री नवीन पटनायक यांचेच सरकार पुन्हा सत्तेवर येईल. मात्र, राज्यात भाजप बिजदपेक्षा लोकसभेच्या अधिक जागा जिंकेल, असा एक्झिट पोलचा निष्कर्ष आहे. ओडिशामध्ये लोकसभेच्या २१ जागा असून, त्यापैकी भाजपला ६ ते १९ व बिजदला २ ते १५ जागांवर विजय मिळेल, असे या निष्कर्षांत म्हटले आहे.
काँग्रेसला कदाचित एखादी जागा जिंकता येईल किंवा त्या पक्षाच्या हाती शून्य उरेल. संवाद-कनक पोलमध्ये राज्यात भाजपला लोकसभेच्या १२ जागा, बिजदला ६ जागा मिळतील, असे म्हटले आहे. टाइम्स नाऊच्या पोलमध्ये बिजदला ८, भाजपला १२, काँग्रेसला १ जागा मिळण्याची शक्यता वर्तविली आहे.
147
सदस्यांच्या ओडिशा विधानसभा निवडणुकांत संवाद-कनक न्यूज पोलच्या निष्कर्षानुसार बिजद ८५ ते ९५ जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवेल. भाजपला २१ ते ३४, काँग्रेसला १२ ते १५ जागा मिळण्याची शक्यता आहे. २०१४ साली झालेल्या विधानसभा निवडणुकांत बिजदने ११७, काँग्रेसने १६ व भाजपने १० जागा जिंकल्या होत्या.