चंद्राबाबूंनी घेतली देवेगौडांची भेट, विरोधकांच्या एकजुटीला बळकटी येण्याची चिन्हे
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2018 03:31 AM2018-11-09T03:31:02+5:302018-11-09T03:31:35+5:30
आगामी २०१९ च्या निवडणुकीत मोदी सरकारविरोधात विरोधीपक्षांना एकत्र आणण्यासाठी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी पुढाकार घेतला आहे. गुरुवारी त्यांनी माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांची भेट घेतली.
बेंगळुरु/ कोलकाता : आगामी २०१९ च्या निवडणुकीत मोदी सरकारविरोधात विरोधीपक्षांना एकत्र आणण्यासाठी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी पुढाकार घेतला आहे. गुरुवारी त्यांनी माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांची भेट घेतली. यावेळी कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामीदेखील उपस्थित होते.
भेटीनंतर देवेगौडा म्हणाले, मोदी सरकारच्या काळात संविधानिक संस्थांना धोका निर्माण झाला आहे. याविरोधात सर्व धर्मनिरपेक्ष नेत्यांनी एकत्र यायला हवे. काँग्रेस भलेही १७ राज्यांमध्ये भाजापकडून हरली असली तरी आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांची कामगिरी चांगली राहील. त्यामुळे चंद्राबाबू नायडू यांनी सुरु केलेल्या विरोधकांच्या एकजुटीच्या मोहिमेला काँग्रेसने मदत करावी असे आवाहन त्यांनी केले.
कर्नाटकातील पोटनिवडणुकांमध्ये जेडीएस आणि काँग्रेस युतीने मोठा विजय मिळवल्यानंतर गुरुवारी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि तेलगू देसम पार्टीचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांनी जनता दल युनायटेडचे सर्वेसर्वा एच. डी. देवेगौडा यांची भेट घेतली. नायडू यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचीदेखील भेट घेतली होती.
दरम्यान, चंद्राबाबू नायडू यांनी माध्यमांशी बोलताना विरोधकांच्या एकजुटीत काँग्रेसची महत्त्वपूर्ण भूमिका राहील, असे सांगितले. विरोधकांचा पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण असेल, या प्रश्नावर मात्र त्यांनी मौन पाळले.पंतप्रधानपदाचे नंतर पाहू, आधी देश वाचवायचा आहे, असे ते म्हणाले.
आपल्याला देशाला तसेच लोकशाहीला वाचवण्यासाठी एकत्र यायला हवे. सीबीआय अडचणीत आहे. आरबीआयवर देखील हल्ला होत आहे. ईडी, इन्कम टॅक्स विभाग यांचा वापर विरोधकांवर हल्ला करण्यासाठी केला जात आहे. उत्तर प्रदेश, बिहार, गुजरात या ठिकाणी विरोधकांविरोधात या संस्थांचा वापर केला जात आहे. राफेलवर पंतप्रधान मोदी काहीही बोलण्यास तयार नाहीत. दोन वर्षांनंतरही अद्याप नोटाबंदीचे फायदे दिसून आलेले नाहीत. इंधनाचे भाव वाढतच आहेत. नोटाबंदीमुळे अर्थव्यवस्था धोक्यात आली असून महागाईतही वाढ झाली आहे. देशातील अल्पसंख्यांकांवर दबाव असून संविधानही धोक्यात आले आहे.
चंद्राबाबूंनी याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारुख अब्दुल्ला, बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्ष मायावती, सपाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांचीही भेट घेतली आहे. ते आता द्रमुकचे प्रमुख स्टॅलिन यांची भेट घेणार आहेत.
दरम्यान भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेनेदेखील सामना या ‘मुखपत्रातून’ कर्नाटकमधील पोटनिवडणुकीतील पराभवाबद्दल भाजपचा खरपूस समाचार घेतला. त्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कालच्या निकालाकडे अंगुली निर्देश करीत २०१९ मध्ये काँग्रेसला ‘अच्छे दिन’ येण्याची ही सुरुवात असल्याचे म्हटले आहे. (वृत्तसंस्था)