चंद्राबाबू नायडू सध्या भाजपासोबतच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2018 05:03 AM2018-02-05T05:03:28+5:302018-02-05T05:04:10+5:30
केंद्रातील सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून तूर्त बाहेर न पडण्याचा निर्णय आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या तेलुगू देसमने घेतल्याने, भाजपा नेत्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
अमरावती : केंद्रातील सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून तूर्त बाहेर न पडण्याचा निर्णय आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या तेलुगू देसमने घेतल्याने, भाजपा नेत्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
मात्र, केंद्र सरकारने आमच्या मागण्यांबाबत निर्णय न घेतल्यास संसदेत व बाहेर आंदोलनाचा पवित्रा आम्हाला उचलावा लागेल, असा इशाराही पक्षाने दिला आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात विभाजित आंध्र प्रदेशला विशेष दर्जा न दिल्याने वा राज्यासाठी विशेष निधीची तरतूद करण्यात न आल्याने चंद्रबाबू नायडू यांनी भाजला रालोआमधून बाहेर पडण्याचा इशारा दिला होता. त्यासाठी त्यांनी पक्षाच्या नेत्यांची रविवारी बैठक बोलावली होती. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. (वृत्तसंस्था)
अमित शहा यांच्याशी बोलणे नाही
तेलुगू देसमचे लोकसभेत १६ व राज्यसभेत ६ सदस्य आहेत. इतक्या खासदारांचा पाठिंबा कमी झाला असता, तर भाजपाला मोठाच धक्का बसला असता. विशेषत: राज्यसभेत आताच भाजपाप्रणित रालोआला बहुमत नाही.
भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी आज चंद्राबाबू नायडू यांना फोन करून, रालोआतून बाहेर पडू नका, अशी विनंती केली, अशी चर्चा होती. मात्र, नायडू व अमित शहा यांचे संभाषण झाले नसल्याचा दावा चौधरी यांनी केला.