चंद्राबाबूंच्या भेटीगाठी जोरात, लखनौमध्ये केली अखिलेश, मायावतींशी चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2019 07:38 PM2019-05-18T19:38:36+5:302019-05-18T19:39:10+5:30
लोकसभा निवडणुकीच्या निकालांनंतर निर्माण होणाऱ्या परिस्थितीत नरेंद्र मोदी आणि भाजपाला पुन्हा सत्तेत येण्यापासून रोखण्यासाठी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी कंबर कसली आहे.
लखनौ - लोकसभा निवडणुकीच्या निकालांनंतर निर्माण होणाऱ्या परिस्थितीत नरेंद्र मोदी आणि भाजपाला पुन्हा सत्तेत येण्यापासून रोखण्यासाठी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी कंबर कसली आहे. निकालांनंतर विरोधी पक्षांची एकजूट करून सरकार स्थापन करण्यासाठी त्यांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली असून, त्यासाठी आज चंद्राबाबू नायडू यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि शरद पवार यांच्यानंतर बसपाप्रमुख मायावती आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांचीही भेट घेतली.
लोकसभा निवडणुकीचा निकाल लागण्यासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. दरम्यान, 23 मे रोजी मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा सत्तेवर येण्यापासून रोखण्यासाठी विरोधकांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. भाजपाचे बहुमत हुकल्यास मोदींना सत्ता हस्तगत करता येऊ नये, यासाठी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी पुढाकार घेत विरोधी पक्षांच्या नेत्यांची एकजूट करण्यास सुरुवात केली आहे. त्याचा एक भाग म्हणून चंद्राबाबू नायडू यांनी आज काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. लोकसभेत भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला तरी सर्व विरोधी पक्षांना एकत्र करून कर्नाटकप्रमाणे सरकार स्थापन करण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे.
Andhra Pradesh CM and TDP leader N Chandrababu Naidu meets BSP Chief Mayawati in Lucknow. pic.twitter.com/MQ5xlNUW4R
— ANI UP (@ANINewsUP) May 18, 2019
चंद्राबाबू नायडू यांनी सुरू केलेल्या मोर्चेबांधणीमुळे तिसऱ्या मोर्चाच्या स्थापनेची शक्यता वाढली आहे. दरम्यान, भाजपाला सत्तेतून रोखण्यासाठी आम्ही प्रसंगी पंतप्रधानपदावरील दावेदारीही सोडू, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी म्हटले होते. नंतर त्यांनी आपल्या विधानापासून धुमजाव केले होते. मात्र भाजपाला बहुमत न मिळण्याच्या परिस्थितीत काँग्रेस विरोधी पक्षातील कुठल्याही नेत्याला पंतप्रधानपदासाठी पाठिंबा देण्याची शक्यता आहे.
Andhra Pradesh CM and Telugu Desam Party (TDP) Chief N. Chandrababu Naidu met Samajwadi Party Chief Akhilesh Yadav, in Lucknow, today. pic.twitter.com/ujUgNz6Qfq
— ANI UP (@ANINewsUP) May 18, 2019
विरोधी पक्षांच्या एकजुटीसाठी चंद्राबाबू प्रयत्नशील असले तरी बसपाप्रमुख मायावती आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी आपली भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नाही. उत्तर प्रदेशातील महाआघाडीमधील हे नेते 23 मे रोजी निकाल स्पष्ट झाल्यावरच आपली भूमिका जाहीर करण्याची शक्यता आहे.