नितीश कुमारांप्रमाणेच चंद्राबाबू पाया पडण्यासाठी झुकले, मात्र पीएम मोदींनी थेट मिठी मारली....

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2024 02:57 PM2024-06-12T14:57:20+5:302024-06-12T14:58:24+5:30

आज चंद्राबाबू नायडू यांनी आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची, तर अभिनेते पवन कल्याण यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

Chandrababu Naidu Oath Taking Ceremony : Chandrababu bowed to modi, but PM Modi hugged him | नितीश कुमारांप्रमाणेच चंद्राबाबू पाया पडण्यासाठी झुकले, मात्र पीएम मोदींनी थेट मिठी मारली....

नितीश कुमारांप्रमाणेच चंद्राबाबू पाया पडण्यासाठी झुकले, मात्र पीएम मोदींनी थेट मिठी मारली....

Chandrababu Naidu Oath Taking Ceremony : नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा आणि आंध्र प्रदेश (Andhra Pradesh) विधानसभा निवडणुकीत तेलुगु देसम पक्षाचे (TDP) प्रमुख चंद्राबाबू नायडू (Chandrababu Naidu) यांनी एकहाती विजय मिळवला. यानंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि इतर अनेक केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत भव्य शपथविधी साहळा पार पडला. राज्यपाल एस अब्दुल नजीर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी नायडू भावूक झाले आणि मोदींच्या भेटीवेळी त्यांच्या पाया पडण्याचा प्रयत्न केला, मात्र मोदींनी त्यांना थांबवून घट्ट मिठी मारली.

शपथ घेतल्यानंतर चंद्राबाबू भावूक 
आज आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्यात अनेक भावूक क्षण पाहायला मिळाले. आजच्या शपथविधी सोहळ्यात पीएम मोदींसह अनेक केंद्रीय मंत्री, विविध सेलिब्रिटी आणि हजारो समर्थकांची उपस्थिती होती. प्रचंड संघर्षानंतर राज्याची सत्ता मिळाल्यामुळे 74 वर्षीय नायडू खुप भावूक झाले होते. यावेळी पंतप्रधान मोदींनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले. यानंतर नायडूंनी पंतप्रधानांच्या पायाला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला, पण पंतप्रधान मोदींनी लगेचच त्यांना रोखून त्यांची गळाभेट घेतली. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी एनडीएच्या बैठकीत सीएम नितीश कुमार यांनीदेखील मोदींच्या पायाला स्पर्ष करण्याचा प्रयत्न केला होता, पण मोदींनी त्यांनाही रोखले होते.

नायडूंनी घेतला अपमानाचा बदला
विशेष म्हणजे, 2021 मध्ये जगन मोहन रेड्डी यांच्या (Jagan Mohan Reddy) वायएसआर काँग्रेस पक्षाच्या काही आमदारांनी पत्नीचा अपमान केल्याचा आरोप केल्यानंतर चंद्राबाबू नायडू यांनी विधानसभेतून वॉकआउट केले होते. त्यावेली त्यांनी शपथ घेतली होती की, ते मुख्यमंत्री झाल्यानंतरच पुन्हा विधानसभेत पाऊल ठेवतील. पाच वर्षे जगन मोहन रेड्डी यांच्याविरोधात लढा देत आज अखेर नायडूंनी आपल्या अपमानाचा बदला घेतला.

पवन कल्याण राज्याचे उपमुख्यमंत्री
सीएम नायडूं यांच्यासह शपथ घेणाऱ्यांमध्ये आणखी एक मोठे नाव म्हणजे दक्षिणेतील सुपरस्टार पवन कल्याण (Pawan Kalyan) यांचे आहे. जनसेना पक्षाचे प्रमुख पवन कल्याण यांना आंध्रचे उपमुख्यमंत्री बनवण्यात आले आहे. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पवन कल्याण यांनी त्यांचा मोठा भाऊ मेगास्टार चिरंजीवीच्या चरणांना स्पर्श करुन आशीर्वाद घेतला. विशेष म्हणजे, पवन कल्याण यांनीदेखील या मोठ्या विजयासह भावाच्या अपमानाचा बदला घेतला आहे. काही काळापूर्वी चिरंजीवी जगन मोहन यांना भेटायला गेले होते, त्यावेळी त्यांचा अपमान करण्यात आला होता. तो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर चिरंजीवीच्या चाहत्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली होती.

किती मंत्र्यांनी शपथ घेतली?
विजयवाडा येथील गन्नावरम विमानतळाजवळील केसरपल्ली आयटी पार्क येथे झालेल्या शपथविधी सोहळ्यात एकूण 24 मंत्र्यांनी शपथ घेतली. मंत्र्यांमध्ये जनसेनेचे तीन आणि भाजपच्या एका मंत्र्याचा समावेश आहे. चंद्राबाबू नायडू यांचा मुलगा नारा लोकेश यांनीही यावेळी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. या सोहळ्यात माजी उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू, भारताचे माजी सरन्यायाधीश एन.व्ही. रामण्णा, केंद्रीय मंत्री अमित शहा, जे.पी. नड्डा, नितीन गडकरी, राम मोहन नायडू, पेम्मासानी चंद्रशेखर, चिराग पासवान, किशन रेड्डी, रामदास आठवले, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, प्रदेश भाजप अध्यक्ष डी. पुरंदेश्वरी, सुपरस्टार रजनीकांत, चिरंजीवी, लोकप्रिय अभिनेते आणि टीडीपीचे आमदार एन. बालकृष्ण हेही उपस्थित होते.

Web Title: Chandrababu Naidu Oath Taking Ceremony : Chandrababu bowed to modi, but PM Modi hugged him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.