चंद्राबाबू नायडूंची ३१ महिन्यानंतर पूर्ण झाली शपथ; पवन कल्याण यांच्यामुळं 'या' नेत्यानं बदललं नाव
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2024 05:02 PM2024-06-21T17:02:57+5:302024-06-21T17:09:13+5:30
मुख्यमंत्री म्हणून परत येईपर्यंत विधानसभेत पाऊल ठेवणार नाही, अशी शपथ चंद्राबाबू नायडू यांनी घेतली होती.
अमरावती : आंध्र प्रदेशात सत्तापरिवर्तन झाल्यानंतर शुक्रवारी विधानसभेत आमदारांनी शपथ घेतली. यापूर्वी तेलुगू देसम पार्टी (टीडीपी) नेते आणि मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी शपथ घेतली होती. दरम्यान, ३१ महिन्यांपूर्वी चंद्राबाबू नायडू यांनी एक शपथ घेतली होती. ती शपथ पूर्ण झाल्यानंतर त्यांनी आज पहिल्यांदाच विधानसभेत पाऊल ठेवले आहे. मुख्यमंत्री म्हणून परत येईपर्यंत विधानसभेत पाऊल ठेवणार नाही, अशी शपथ चंद्राबाबू नायडू यांनी घेतली होती.
शुक्रवारी विधानसभेत टीडीपीसह मित्रपक्ष जनसेना व भाजपच्या आमदारांनी चौथ्यांदा मुख्यमंत्री बनलेल्या चंद्राबाबू नायडू यांचे जोरदार स्वागत केले. त्यानंतर उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी शपथ घेतली. पहिल्यांदाच विधानसभेवर निवडून आलेले जनसेना नेते आणि अभिनेता पवन कल्याण यांची चंद्राबाबू नायडू यांनी गळाभेट घेतली. उपमुख्यमंत्री पवन कल्याण हे आमदार म्हणून शपथ घेणारे दुसरे व्यक्ती होते. यानंतर विधानसभेतील नवा चेहरा असलेले चंद्राबाबू नायडू यांचा मुलगा नारा लोकेश यांच्यासह अनेक मंत्र्यांनी शपथ घेतली.
सर्व मंत्र्यांनंतर वायएसआरसीपी प्रमुख जगन मोहन रेड्डी यांनी आमदार म्हणून शपथ घेतली. यादरम्यान, जगन मोहन रेड्डी हे चंद्राबाबू नायडू यांचे अभिनंदन करताना दिसले. मात्र, अधिवेशन सुरू झाले, तेव्हा जगन मोहन रेड्डी उपस्थित नव्हते. ते पाच मिनिटे उशिराने विधानसभेच्या आवारात पोहोचले. शपथ घेतल्यानंतर ते सभागृहातून बाहेर पडले. दरम्यान, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत टीडीपी-जनसेना-भाजप युतीने १७५ सदस्यीय विधानसभेत १६४ जागा जिंकल्या.
नेत्याने नाव बदलले
दरम्यान, वायएसआरसीपीचे ज्येष्ठ नेते मुद्रागदा पद्मनाभम यांनी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान जनसेना प्रमुख पवन कल्याण यांचा पराभव करण्याचे आश्वासन दिले होते. तसे न केल्यास आपले नाव बदलू, असे त्यांनी वचन दिले होते. मात्र, या निवडणुकीत मुद्रागदा पद्मनाभम यांचाच पराभव झाला. त्यामुळे त्यांनी दिलेले वचन पूर्ण करत अधिकृतपणे आपले नाव बदलून 'पद्मनाभ रेड्डी' असे ठेवले आहे. पीठापुरम विधानसभा मतदारसंघात पवन कल्याण यांच्या विजयानंतर ७० वर्षीय रेड्डी यांनी नाव बदलले आहे.