चंद्राबाबू नायडूंना भरचौकात गोळ्या घातल्या पाहिजे - जगनमोहन रेड्डी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2017 10:17 PM2017-08-04T22:17:53+5:302017-08-04T22:24:17+5:30
आंध्रप्रदेशातील नंद्यालमध्ये होणा-या पोटनिवडणुकीच्या पहिल्याच दिवशी वायएसआर कॉंग्रेस पार्टीचे प्रमुख जगनमोहन रेड्डी यांनी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्यावर ह्ल्लाबोल केला.
नवी दिल्ली, दि. 4 - आंध्रप्रदेशातील नंद्यालमध्ये होणा-या पोटनिवडणुकीच्या पहिल्याच दिवशी वायएसआर कॉंग्रेस पार्टीचे प्रमुख जगनमोहन रेड्डी यांनी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्यावर ह्ल्लाबोल केला. यावेळी जगनमोहन रेड्डी म्हणाले की, चंद्राबाबू नायडू यांसारख्या लोकांना भरचौकात गोळ्या घातल्या, तर काही चुकीचे होणार नाही.
आंध्रप्रदेशातील नंद्याल मतदार संघासाठी पोटनिवडणूक आहे. यापार्श्वभूमीवर राजकीय पक्षांकडून जोरदार प्रचार सुरु आहे. या प्रचारादरम्यान, वायएसआर कॉंग्रेस पार्टीचे प्रमुख जगनमोहन रेड्डी यांनी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि त्यांच्या मुलावर आरोप केले. यावेळी ते म्हणाले की, चंद्राबाबू नायडू यांनी राज्यातील जनतेला खोटी आश्वासने दिली आहेत. नंद्यालमध्ये वायएसआर कॉंग्रेस पार्टीला मिळणा-या पाठिंब्यामुळे चंद्राबाबू नायडू यांना भीती वाटू लागली आहे. या भीतीमुळेच त्यांनी येथील विकासाकडे लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. अन्यथा एक रुपया सुद्धा त्यांनी दिला नसता, असे जगनमोहन रेड्डी म्हणाले.
ही फक्त पोटनिवडणूक नाही, तर न्याय आणि अन्याय यांच्यातील लढाई आहे. या पोटनिवडणुकीत जनता चंद्राबाबू नायडू यांच्याविरोधात आहे. त्यामुळे चंद्राबाबू नायडू यांसारख्या भ्रष्टाचार करणा-या लोकांना जर भरचौकात गोळ्या घातल्या, तर काही चुकीचे होणार नाही. त्यांच्या हातात सत्ता असून त्यांनी येथील शेतकरी, महिला आणि बेरोजगारांना काही दिले नाही. फक्त निवडणुकीच्या काळात अशा लोकांना खोटी आश्वासने दिले, असेही यावेळी जगनमोहन रेड्डी म्हणाले.
दरम्यान, जगनमोहन रेड्डी यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी तेलगू देशम पार्टीच्या एका स्थानिक नेत्याने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.