आंध्रला विशेष राज्याचा दर्जा द्या; चंद्राबाबूंचे एकदिवसीय उपोषण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2019 12:09 PM2019-01-28T12:09:48+5:302019-01-28T12:32:18+5:30
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे.
अमरावती - आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष राज्याचा दर्जा न देण्याची भूमिका मोदी सरकारने घेतल्याच्या विरोधात नायडू 13 फेब्रुवारी रोजी दिल्लीमध्ये एक दिवसाचे उपोषण करणार आहेत. 13 फेब्रुवारी हा संसदेच्या केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे.
चंद्राबाबू नायडू हे अनेक दिवसांपासून सातत्याने आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याची मागणी करत आहेत. आंध्र प्रदेशची राजधानी असलेल्या अमरावतीत चंद्राबाबू यांनी तेलगू देसम संसदीय पक्षाची बैठक घेतली. यावेळी उपोषणाचा निर्णय घेण्यात आला. आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा दिला नाही याच्या निषेधार्थ गेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या वेळी तेलगू देसम पार्टी रालोआतून बाहेर पडली आहे. भाजपा सरकार आंध्र प्रदेशला विशेष दर्जा देऊ शकले नाही याच्या निषेधार्थ आंध्र प्रदेशात 1 फेब्रुवारी रोजी राज्यव्यापी बंद पाळण्यात येणार आहे.
लोकसभा निवडणुकांत भाजपाचा पराभव निश्चित असून, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घरी पाठविण्याची वेळ जवळ आली आहे, असे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी याआधी म्हटले होते. तसेच आंध्र प्रदेशच्या हक्काचे 1.6 लाख कोटी रुपये केंद्र सरकारने अद्यापही दिलेले नाहीत. यासंदर्भात मी पंतप्रधान मोदी यांना पत्रही लिहिले. या राज्याकडे भाजपा जाणूनबुजून दुर्लक्ष करत असल्याचं नायडू यांनी म्हटलं आहे.