चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2024 04:38 PM2024-09-22T16:38:46+5:302024-09-22T16:39:53+5:30
Tirupati Laddu Controversy: तिरुमाला तिरुपती मंदिरातील प्रसादाच्या लाडवांसाठी वापरण्यात येणाऱ्या तुपामध्ये भेसळ झाल्याच्या मुद्द्यावरून सध्या आंध्र प्रदेशच्या राजकारणात जोरदार आरोप प्रत्यारोप होत आहेत.
तिरुमाला तिरुपती मंदिरातील प्रसादाच्या लाडवांसाठी वापरण्यात येणाऱ्या तुपामध्ये भेसळ झाल्याच्या मुद्द्यावरून सध्या आंध्र प्रदेशच्या राजकारणात जोरदार आरोप प्रत्यारोप होत आहेत. दरम्यान, आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि वायएसआर काँग्रेस पक्षाचे प्रमुख जगन मोहन रेड्डी यांनी या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. तसेच या प्रकरणात आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्र चंद्राबाबू नायडू यांनी तिरुमाला तिरुपती देवस्थानम (TTD) वर केलेले आरोप हे बिनबुडाचे असून, या आरोपांविरोधात कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
चंद्राबाबू नायडू यांनी तिरुमाला येथे देण्यात येणारे लाडू बनवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या तुपाच्या शुद्धतेबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नाचा जगनमोहन रेड्डी यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे. तसेच तुपाच्या खरेदीसाठीची ई टेंडरिंग प्रक्रिया, एनएबीएल-प्रमाणित लॅब टेस्ट आणि अनेक पातळ्यांवरील तपास यांचा समावेश आहे. तसेच तेलुगू देसम पक्षाच्या सत्तेच्या काळातही अशीच व्यवस्था लागू होती, असेही जगनमोहन रेड्डी यांनी सांगितले.
दरम्यान, खोट्या आरोपांमुळे टीटीडीची प्रतिष्ठा आणि भक्तांचा असलेला विश्वास यांना धक्का बसू शकतो, असे सांगत जगनमोहन रेड्डी यांनी या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चंद्राबाबू नायडू यांना खडसावून भक्तांचा विश्वास आणि आस्था पुनर्प्रस्थापित व्हावी यासाठी सत्य समोर आणावं, असं आवाहनही जगनमोहन रेड्डी यांनी केलं आहे.
दरम्यान, चंद्राबाबू नायडू यांनी केलेले बिनबुडाचे दावे हे सरकारच्या अपयशावरून लक्ष विचलित करण्यासाठी आणि आपला राजकीय अजेंडा पुढे रेटण्यासाठीचा प्रयत्न असल्याचा आरोप जगनमोहन रेड्डी यांनी केला आहे.