चंद्राबाबूंनी ज्याला म्हटले EVM एक्सपर्टस् तो निघाला EVM चोर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2019 05:18 PM2019-04-14T17:18:07+5:302019-04-14T17:19:06+5:30
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ईव्हीएममध्ये गोंधळ झाल्याचा आरोप करत शनिवारी निवडणूक आयोगाकडे धाव घेतली होती.
नवी दिल्ली - आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ईव्हीएममध्ये गोंधळ झाल्याचा आरोप करत शनिवारी निवडणूक आयोगाकडे धाव घेतली. एका ईव्हीएम एक्सपर्ट्सच्या हवाल्याने चंद्राबाबू नायडूंनी हा दावा केला होता. मात्र निवडणूक आयोगाने जेव्हा त्या एक्सपर्ट्सला या दाव्याबाबत अधिक माहिती आणण्यास सांगितले तेव्हा हा एक्सपर्ट्स दुसरातिसरा कुणी नाही तर हैदराबाद येथील रहिवासी हरिप्रसाद असल्याचे समोर आले. तसेच 2010 मध्ये ईव्हीएम चोरीप्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती.
चंद्राबाबू नायडू यांनी निवडणूक आयोगाकडे धाव घेतल्यानंतर संध्याकाळी हरिप्रसाद याने निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यानंतर अधिकाऱ्यांनी हरिप्रसाद याचा इतिहास शोधून काढला. त्यावेळी इव्हीएममध्ये छेडछाड करता येऊ शकते असा दावा अनेक वर्षांपासून करणारी व्यक्ती हरिप्रसादच असल्याचे समोर आले. तसेच याच हरिप्रदासने आपला दावा सिद्ध करण्यासाठी परदेशी तज्ज्ञाच्या मदतीने ईव्हीएम मशीन चोरली होती.
हरिप्रदास हा टीडीपीच्या लीगल सेलसोबत निवडणूक उपायुक्त सुदीप जैन यांना भेटण्यासाठी आला तेव्हा अधिकाऱ्यांनी त्याचे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे रेकॉर्ड समोर ठेवले. त्यानंतर हरिप्रसाद आणि त्याच्यासोबत आलेली मंडळी तिथून निघून गेली. त्यानंतर निवडणूक आयोगाने टीडीपीच्या लीगल सेलला कठोर शब्दात पत्र लिहून गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या व्यक्तीला प्रतिनिधीमंडळात तज्ज्ञ म्हणून जागा कशी मिळाली अशी विचारणा केली.
दरम्यान, हरिप्रसाद याला 2010 साली ईव्हीएम चोरी प्रकरणी अटक करण्यात आली होती. मात्र नंतर त्याची जामीनावर मुक्तता करण्यात आली होती. तो 2009पासूनच ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे. मात्र 2009 मध्ये आयोजित हॅकेथॉनमध्ये त्याला ईव्हीएम हॅक करता आले नव्हते.