चंद्रचूड, खानविलकर सुप्रीम कोर्टात न्यायाधीश ?
By admin | Published: May 5, 2016 03:52 AM2016-05-05T03:52:34+5:302016-05-05T03:52:34+5:30
मूळचे महाराष्ट्राचे असलेले अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश धनंजय यशवंत चंद्रचूड व मध्य प्रदेश मुख्य न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश अजय माणिकराव खानविलकर
नवी दिल्ली : मूळचे महाराष्ट्राचे असलेले अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश धनंजय यशवंत चंद्रचूड व मध्य प्रदेश मुख्य न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश अजय माणिकराव खानविलकर यांची सर्वोच्च न्यायालयावर न्यायाधीश म्हणून नियुक्ती होणे निश्चित आहे.
नेमणूक झाल्यास न्या. चंद्रचूड आठ वर्षे तर न्या. खानविलकर सहा वर्षे तेथे न्यायाधीश राहतील. दोघांचीही प्रथम मुंबई उच्च न्यायालयावर नियुक्ती झाली व तेथून ते इतर ठिकाणी मुख्य न्यायाधीश म्हणून गेले. न्या. चंद्रचूड यांचे वडील दिवंगत न्या. वाय. व्ही. चंद्रचूड देशाचे सरन्यायाधीश होते. उच्च न्यायालयात नियुक्तीपूर्वी न्या. खानविलकर सर्वोच्च न्यायालयातच वकिली करायचे. सर्वोच्च न्यायालयात सध्या न्या. शदर बोबडे व न्या. उदय लळित हे महाराष्ट्रातील न्यायाधीश आहेत.
सर्वोच्च न्यायालयाच्या ‘कॉलेजियम’ने एकूण चार नव्या न्यायाधीशांच्या नावांची शिफारस केली असून, त्यावर केंद्रीय विधी व न्याय मंत्रालयात पुढील प्रक्रिया सुरू आहे. या चारमध्ये न्या. चंद्रचूड व न्या. खानविलकर यांच्याखेरीज केरळ उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्या. अशोक भूषण व ज्येष्ठ वकील व माजी अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एल. नागेश्वर राव यांचाही समावेश आहे.