UP Election 2022: UP निवडणुकीत आता जिनानंतर चंद्रगुप्त मौर्य; योगी म्हणाले चंद्रगुप्तानं सिकंदराला हरवलं, ओवेसी म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2021 12:22 PM2021-11-15T12:22:15+5:302021-11-15T12:24:17+5:30
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी यूपी निवडणुकीत नव्या वादाला तोंड फोडले आहे. ते रविवारी लखनौ येथे भाजपच्या मौर्य कुशवाह अधिवेशनाला प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. यावेळी त्यांनी मागास समाजाच्या मान-सन्मानाचा मुद्दा उपस्थित केला.
यूपी निवडणुकीत सत्तेसाठी राजकारण्यांमधील संघर्ष तीव्र होत आहे. यूपी निवडणुकीत जिनांनंतर आता सम्राट चंद्रगुप्त मौर्य यांचा प्रवेश झाला आहे. ज्यांनी इतिहास लिहिला त्यांनी चंद्रगुप्ताला न्याय दिला नाही, असा आरोप योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी केला. यानंतर, असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी योगींना इतिहास वाचण्याचा सल्ला दिला आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी यूपी निवडणुकीत नव्या वादाला तोंड फोडले आहे. ते रविवारी लखनौ येथे भाजपच्या मौर्य कुशवाह अधिवेशनाला प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. यावेळी त्यांनी मागास समाजाच्या मान-सन्मानाचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले, 'इतिहासात सम्राट अशोक किंवा चंद्रगुप्त मौर्याचे वर्णन महान, असे केले गेले नाही, तर चंद्रगुप्त मौर्याने पराभूत झालेल्या सिकंदराचे वर्णन महान, असे केले गेले. या मुद्द्यावर इतिहासकार मौन आहेत. कारण सत्य भारतातील जनते समोर आले, तर भारत पुन्हा उभा राहील.
ओवेसींचा योगींना इतिहास वाचण्याचा सल्ला -
ज्यांनी इतिहास लिहिला त्यांनी चंद्रगुप्ताला न्याय दिला नाही, असा आरोप योगी आदित्यनाथ यांनी केला, यानंतर असदुद्दीन ओवेसी यांनी त्यांना थेट इतिहास वाचण्याचाच सल्ला दिला.
हैदराबादचे खासदार ओवेसी म्हणाले, हिंदुत्व हा खोट्या इतिहासाचा कारखाना आहे. चंद्रगुप्त आणि अलेक्झांडर कधीही लढले नाहीत. त्यांच्यात युद्ध झाले नाही. एखाद्याचे म्हणणे हेच स्पष्ट करते की आपल्याला चांगली शिक्षण व्यवस्था का हवी आहे. चांगल्या शाळांच्या आभावामुळे बाबा लोक स्वतःच्या मनानेच काहीही तथ्य तयार करतात. बाबा शिक्षणाला महत्त्व देत नाहीत, हेच त्यांच्या विधानातून दिसून येते.
तत्पूर्वी, सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त हरदोई येथे झालेल्या सभेत समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी स्वातंत्र्यलढ्यातील सरदार पटेल, महात्मा गांधी आणि जवाहरलाल नेहरू यांच्या योगदानाचे कौतुक करत याच कडीत मोहम्मद अली जिनाचेही नाव जोडले होते. जिना पाकिस्तानचे पहिले गव्हर्नर होते.