‘चांद्रयान-२’चा चंद्राच्या भ्रमण कक्षेत प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2019 05:01 AM2019-08-29T05:01:10+5:302019-08-29T05:01:17+5:30
मोहिमेचा तिसरा टप्पा पूर्ण : ७ सप्टेंबरला सुरू होणार गुंतागुंतीची प्रक्रिया
बंगळुरू : ‘चांद्रयान-२’ला चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्यास अवघे ११ दिवस राहिलेले असताना उपग्रहाने चंद्राच्या तिसऱ्या कक्षेत प्रवेश करण्यासाठीचा प्रयत्न यशस्वी केला आणि उपग्रहाचे सगळे मापदंड (पॅरामीटर्स) हे सामान्य होते, असे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) बुधवारी सांगितले.
‘सध्या चांद्रयान-२ चंद्राच्या भ्रमण कक्षेत आहे. चांद्रयान-२ उपग्रह चंद्राच्या दिशेने जाण्यासाठीची तिसरी प्रक्रिया गुरुवारी (२८ आॅगस्ट, २०१९) यशस्वीपणे पूर्ण केली गेली. ती प्रॉपल्शन सिस्टीम वापरून भारतीय प्रमाण वेळ ९ वाजून चार मिनिटांनी सुरू झाली. या प्रक्रियेचा कालावधी १,१९० सेकंदांचा होता. भ्रमणकक्षा १७९ किलोमीटर गुणिले १,४१२ किलोमीटर साध्य केली गेली, असे इस्रोने सांगितले. चंद्राच्या भ्रमणकक्षेत जाण्यासाठीची यापुढील प्रक्रिया ३० आॅगस्ट, २०१९ असून ती भारतीय प्रमाण वेळ सायंकाळी सहा ते सातमध्ये होईल. भारताच्या या दुसºया चांद्र मोहिमेतील हा महत्त्वाचा टप्पा असून, चांद्रयान-२ उपग्रहाने चंद्राच्या भ्रमणकक्षेत २० आॅगस्ट रोजी लुनार आॅर्बिट इन्सर्शन प्रक्रियेने यशस्वीपणे प्रवेश केला होता. चंद्राच्या भ्रमणकक्षेत प्रवेश करण्याची दुसरी प्रक्रिया २१ आॅगस्ट रोजी झाल्यानंतर इस्रोने चांद्रयान-२ ने चंद्राची घेतलेल्या छायाचित्रांचे दोन संच जाहीर केले होते. (वृत्तसंस्था)
शेवटच्या प्रवेशासाठी दोन प्रक्रिया
चंद्राच्या पृष्ठभागापासून सुमारे १०० किलोमीटर अंतरावरील चंद्र ध्रुवांवरून जाणाºया शेवटच्या भ्रमणकक्षेत प्रवेशासाठी आणखी दोन प्रक्रिया केल्या जाणार आहेत.
यानंतर लँडर आॅर्बिटरपासून २ सप्टेंबर रोजी वेगळा होईल आणि चंद्राभोवती असलेल्या १०० किलोमीटर गुणिले ३० किलोमीटर भ्रमणकक्षेत प्रवेश करील. त्यानंतर उपग्रह ७ सप्टेंबर, २०१९ रोजी चंद्राच्या दक्षिण धु्रव भागात अलगदरीत्या उतरण्यासाठी गुंतागुंतीच्या अशा मालिकेत काम करील, असेही इस्रोने सांगितले.