आज होणाऱ्या प्रक्षेपणासाठी ‘चांद्रयान-२’ पूर्णपणे सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2019 03:45 AM2019-07-22T03:45:36+5:302019-07-22T03:45:52+5:30

तांत्रिक बिघाड दूर; रंगीत तालमीनंतर काऊंट डाऊन सुरू

'Chandrayaan-2' fully equipped for the launch today | आज होणाऱ्या प्रक्षेपणासाठी ‘चांद्रयान-२’ पूर्णपणे सज्ज

आज होणाऱ्या प्रक्षेपणासाठी ‘चांद्रयान-२’ पूर्णपणे सज्ज

Next

निनाद देशमुख 

श्रीहरीकोटा : भारताची ‘चांद्रयान-२’ ही महत्त्वाकांक्षी अंतराळ मोहीम सोमवारी दुपारी होणाºया प्रक्षेपणासाठी पूर्णपणे सज्ज असल्याचे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) रविवारी जाहीर केले. ‘चांद्रयान-२’ मोहिमेवर जाणाºया ‘जीएसएलव्ही-मार्क-३’ या शक्तिशाली रॉकेटचे सोमवारी दुपारी २.४३ वाजता श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ तळावरून प्रक्षेपण व्हायचे आहे.

इस्रो’चे अध्यक्ष के. सिवान यांनी सांगितले की, आधी १५ जुलै रोजी ठरलेले प्रक्षेपण ज्या तांत्रिक अडचणीमुळे ऐन वेळी पुढे ढकलावे लागले होते, ती अडचण दूर करण्यात आली असून, रॉकेट प्रक्षेपणासाठी तयार आहे.

सिवान म्हणाले की, शनिवारी सायंकाळी प्रक्षेपक रॉकेटची व इतर अनुषंगिक यंत्रणांची पुन्हा एकदा पूर्णांशाने रंगीत तालीम घेण्यात आली. त्यात कोणतीही अडचण किंवा दोष न आढळल्याने प्रक्षेपणासाठी उलटी गणती सुरू झाली आहे. आधी तीन वेळा पुढे ढकललेले प्रक्षेपण १५ जुलै रोजी पहाटे व्हायचे होते. त्यासाठी श्रीहरिकोट्याच्या अंतराळ तळापाशी उभारलेल्या दर्शक दीर्घेमध्ये जगभरातील पत्रकारांसह अनेक मान्यवरही जमले होते, परंतु उड्डाणाला अवघी ५६ मिनिटे शिल्कक असताना प्रक्षेपक रॉकेटमध्ये काही बिघाडाचा संशय आल्याने सावधगिरी म्हणून प्रक्षेपण थांबविण्यात आले होते.

त्यावेळी नेमके काय झाले होते हे ‘इस्रो’ने अधिकृतपणे उघड केलेले नाही. मात्र विश्वसनीय सूत्रांनुसार रॉकेटच्या तिसऱ्या टप्प्यात असलेल्या क्रायोजेनिक इंजिनच्या द्रवरूप इंधनाच्या टाकीमधील हवेचा दाब इंधन भरल्यानंतर कमी होत असल्याचे जाणवले होते. त्यामुळे टाकीच्या व्हाल्व्हमधून तर गळती होत नसावी ना, अशी शंका आली होती. परंतु तंत्रज्ञांच्या तज्ज्ञ समितीने आता याचे पूर्णपणे समाधानकारक निरसन केले आहे. चंद्रावर उतरल्यावर लँडरमध्ये ठेवलेली ‘रोव्हर’ ही छोटेखानी चारचाकी गाडी उतरत्या फलाटावरून बाहेर पडेल. त्यावेशी चंद्रावर नुकताच दिवस उगवलेला असेल. तो संपूर्ण चांद्रदिन (पृथ्वीवरील १४ दिवस) हे ‘रोव्हर’ अत्यंत धीम्यागतीने चंद्राच्या पृष्ठभागावर ५०० मीटरपर्यंतचा फेरफटका मारेल. यात ते चंद्राच्या मातीचे विश्लेषण करण्याखेरीज इतरही अनेक वैज्ञानिक प्रयोग करेल.
‘आॅर्बिटर’ त्यानंतर पुढील एक वर्षे चंद्राच्या प्रदक्षिणा करून त्याचे सविस्तर नकाशे तयार करेल. चंद्रावर अलगद उतरणे हाच ‘चाद्रयान-१’ व ‘चांद्रयान-२’ मधील मुख्य फरक आहे. ‘चांद्रयान-१’ मोहिमेत वरून टाकल्याने चंद्रावर आदळत उतरले होते. ‘चांद्रयान-१’ने चंद्रावर गोठलेले पाणी असल्याचा शोध लावला होता. आता ‘चांद्रयान-२’चे लँडर जेथे उतरणार आहे त्या चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर खूप खोल विवरे असून तेथे साठलेला बर्फ असण्याची शक्यता आहे.

अलगद उतरण्याचे असेल आव्हान
प्रक्षेपक रॉकेट स्वत:सह एकूण 3.8टन वजनासह उड्डाण करेल. त्यात ‘ऑर्बिटर’, ‘विक्रम’ हा लँडर व ‘प्रज्ञान’ हे रोव्हर असे तीन प्रमुख भाग असतील.
57दिवस योग्य कक्षा व उंची गाठण्यासाठी पृथ्वीभोवती घिरट्या घातल्यानंतर हे रॉकेट चंद्राच्या कक्षेत पोहोचेल.6-7 सप्टेंबर रोजी रॉकेटमधून एकत्र बांधणी केलेले लँडर व रोव्हर बाहेर पडेल. ते चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ एका पूर्वनिर्धारित स्थळी अलगद उतरविले जाईल.
चंद्राच्या पृष्ठभागावर असे अलगद उतरणे हेच मोठे जिकिरीचे आव्हान आहे. ते फत्ते झाले, तर अशी क्षमता असलेला भारत हा अमेरिका, रशिया व चीननंतरचा चौथा देश ठरेल.

 

Web Title: 'Chandrayaan-2' fully equipped for the launch today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.