Chandrayaan-2: ...अन् देशाचा श्वासच थांबला; शेवटच्या दोन मिनिटांत नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2019 10:52 AM2019-09-07T10:52:42+5:302019-09-07T11:01:10+5:30
इस्रोसह कोट्यवधी भारतीयांची निराशा
बंगळुरू: इस्रोचा विक्रम लँडरशी असलेला संपर्क तुटल्यानं चांद्रयान-2 मोहिमेला धक्का बसला. जवळपास संपूर्ण मोहीम अगदी सुरळीत सुरू असताना अखेरच्या दोन मिनिटांमध्ये इस्रोच्या हाती निराशा आली. यानंतर भावूक झालेल्या इस्रो प्रमुख के. सिवन यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी धीर दिला.
भारतीय चांद्रयान-२ चे विक्रम हे लँडर शनिवारी पहाटे १ वाजून ५५ मिनिटांनी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करण्याच्या बेतात असतानाच ऑर्बिटरचा आणि लँडरचा संपर्क तुटला. लँडर चंद्राच्या पृष्ठभागापासून २.१ किलोमीटरपर्यंत पोहोचले, तोपर्यंत त्याचा नियोजित दिशेनं प्रवास सुरळीत सुरू होता. त्यानंतर त्याचा संपर्क तुटला. त्यामुळे लँडरची दिशा आणि ठिकाण कळण्यात अडचणी निर्माण झाल्या. तथापि, पर्यायी योजनेच्या माध्यमातून आकडेवारी मिळविण्यासाठी शास्त्रज्ञ कसोशीने कामाला लागले होते. इस्रोचे अध्यक्ष के. शिवन यांनी सांगितले की, प्राप्त आकडेवारीचे विश्लेषण करण्यात येत आहे.
Chandrayaan-2 : इस्रो प्रमुख के. सिवन यांना अश्रू अनावर; पंतप्रधान मोदींनी दिला धीरhttps://t.co/78RMUGVZXs#Chandrayan2#NarendraModipic.twitter.com/RRIVOZSVG3
— Lokmat (@MiLOKMAT) September 7, 2019
लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याच्या दिशेनं योग्य वाटचाल करत असल्यानं इस्रोचे शास्त्रज्ञ आनंद व्यक्त करत होते. मात्र त्यानंतर विक्रमचा इस्रोशी असलेला संपर्क तुटला. अपेक्षित असलेलं हळुवार (सॉफ्ट) लँडिंग न झाल्यानं संपर्क तुटला असावा, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. विक्रमनं हार्ड लँडिंग केलं असलं तरी त्यावरील बाह्य उपकरणांनी त्याची निरीक्षणं घेता येतील. यामध्ये लेजर मिरर, सिसमोग्राफ, उच्च दर्जाच्या कॅमेऱ्यांचा समावेश आहे. चंद्राभोवती फिरणाऱ्या यानातूनही अधिकची माहिती मिळेल.
Chandrayaan-2 : विज्ञानात प्रयोग असतात, अपयश नाही - नरेंद्र मोदीhttps://t.co/DPKbyeT025#NarendraModi#Chandrayan2pic.twitter.com/NpRxBNU3vA
— Lokmat (@MiLOKMAT) September 7, 2019
विक्रमसोबतचा संपर्क तुटल्यानं इस्रोसह देश निराश झाला. मात्र इस्रोच्या एका शास्त्रज्ञानं आयएएनएस वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार यामुळे केवळ 5 टक्के मोहिमेवर परिणाम झाला आहे. 'लँडर विक्रम आणि प्रज्ञान रोव्हरमुळे झालेलं नुकसान फक्त 5 टक्के इतकं आहे. चांद्रयान-2 ऑर्बिटर अजूनही चंद्राच्या कक्षेत आहे. त्याच्याकडून चंद्राची परिक्रमा सुरू आहे. या ऑर्बिटरच्या माध्यमातून इस्रोला वर्षभर चंद्राचे फोटो मिळू शकतात,' अशी माहिती नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर वृत्तसंस्थेला दिली.