Chandrayaan-2: इस्रोसाठी 'हे' पाच महिने सर्वात लकी; जाणून घ्या कोणते...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2019 03:40 PM2019-07-22T15:40:32+5:302019-07-22T15:48:55+5:30
31 वर्षांनंतर जुळून आला योगायोग; २२ जुलैला इस्रोकडून प्रक्षेपण
श्रीहरीकोटा: इस्रोच्या महत्त्वाकांक्षी चंद्रयान-२चं प्रक्षेपण यशस्वीपणे पार पडलं. दुपारी 2.43 मिनिटांनी चंद्रयान-२ अवकाशात झेपावलं. आजपासून ३१ वर्षांपूर्वी याच दिवशी इस्रोची एक मोहीम अपयशी ठरली होती. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये इस्रोनं कमालीचं सातत्य राखलं आहे. त्यामुळे अनेक देश उपग्रह सोडण्याची जबाबदारी विश्वासानं इस्रोवर सोपवत आहेत. यातून देशाला मोठ्या प्रमाणात परकीय चलन मिळत आहे.
इस्रोनं आतापर्यंत ३७० उपग्रह अवकाशात सोडले आहेत. यातील १०१ आपल्या देशाचे आणि २६९ परदेशी आहेत. इस्रोनं प्रक्षेपित केलेल्या उपग्रहांचा देशाला मोठा फायदा झाला आहे. दूरसंचार, आपत्ती व्यवस्थापन, इंटरनेट, संरक्षण, हवामान, शिक्षण अशा विविध क्षेत्रांमध्ये इस्रोनं महत्त्वपूर्ण योगदान दिलं आहे. येत्या काळात इस्रो वर्षाकाठी १० ते १२ प्रक्षेपणं करणार आहे. याचा अर्थ दर महिन्याला इस्रोकडून एक प्रक्षेपण केलं जाईल. इस्रोचं प्रमुख डॉ. के. सिवन यांनी काही महिन्यांपूर्वीच ही माहिती दिली होती.
इस्रोनं ३१ वर्षांपूर्वी २२ जुलैला केलं होतं प्रक्षेपण
याआधी ३१ वर्षांपूर्वी इस्रोनं INSAT-1C चं प्रक्षेपण केलं होतं. २२ जुलै १९८८ मध्ये हे प्रक्षेपण पार पडलं. कोराऊस्थित युरोपियन लॉन्च पॅडवरुन एरियन-३ या रॉकेटच्या माध्यमातून प्रक्षेपण करण्यात आलं. मात्र ही मोहीम पूर्णपणे यशस्वी झाली नाही. इनसॅट-१शी संबंधित १२ सी-बँड ट्रान्सपाँडर्सपैकी ६ ट्रान्सपाँडर्सचं काम करत होते. तर २ एस-बँड ट्रान्सपाँडर्स नादुरुस्त झाले. मात्र या उपग्रहानं अनेक वर्षे इस्रोला हवामानासंबंधीची माहिती देणारे फोटो दिले. त्याचा इस्रोला खूप उपयोग झाला.
कोणते महिने इस्रोसाठी सर्वात यशस्वी?
जानेवारी, फेब्रुवारी, मे, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात इस्रोनं आतापर्यंत केलेली सर्व प्रक्षेपणं यशस्वी ठरली आहेत. गेल्या ४४ वर्षांमध्ये जानेवारीत इस्रोनं ९ प्रक्षेपणं केली. तर फेब्रुवारीत ५, मेमध्ये १०, ऑक्टोबरमध्ये ७ आणि नोव्हेंबरमध्ये ५ प्रक्षेपणं केली. ही सर्वच्या सर्व प्रक्षेपणं यशस्वी ठरली.
या ५ महिन्यांत इस्रोच्या यशाची टक्केवारी ८७ ते ९४ टक्के
मार्च, एप्रिल, जून, सप्टेंबर, डिसेंबरमध्ये इस्रोच्या यशाची टक्केवारी ८७ ते ९४ टक्के राहिली आहे. आतापर्यंत इस्रोनं मार्चमध्ये एकूण ८ प्रक्षेपणं केली. त्यातील एकमेव प्रक्षेपण अपयशी ठरलं. जूनमध्ये इस्रोनं ८ मोहिमा राबवल्या. यातील ७ मोहिमा यशस्वी झाल्या. डिसेंबरमध्ये आतापर्यंत ९ प्रक्षेपणं झाली. त्यातील एकच प्रक्षेपण अपयशी ठरलं. सप्टेंबरमध्ये झालेल्या ११ प्रक्षेपणांपैकी केवळ एक प्रक्षेपण अयशस्वी ठरलं. एप्रिलमध्ये सर्वाधिक १७ प्रक्षेपणं हाती घेण्यात आली. त्यातील फक्त एक प्रक्षेपण अपयशी ठरलं.
जुलै, ऑगस्टमध्ये माफक यश
इस्रोनं १९७५ पासून आतापर्यंत जुलैमध्ये १० प्रक्षेपणं केली. यातील ३ प्रक्षेपणं अपयशी ठरली. तर ऑगस्टमध्ये हाती घेण्यात आलेल्या ६ पैकी ४ मोहिमांना यश आलं. तर २ अपयशी ठरल्या.