Chandrayaan 2: इस्रोने मानले देशवासियांचे आभार, सांगितले भारतीयांची स्वप्ने पूर्ण करत राहू
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2019 08:55 AM2019-09-18T08:55:28+5:302019-09-18T08:58:29+5:30
भारताच्या चांद्रयान-2 मोहिमेतील विक्रम लँडरचे सॉफ्ट लँडिंग अपयशी ठरल्यानंतरही देशभरातून इस्रोला पाठिंबा मिळाला होता. दरम्यान...
बंगळुरू - भारताच्याचांद्रयान-2 मोहिमेतील विक्रम लँडरचे सॉफ्ट लँडिंग अपयशी ठरल्यानंतरही देशभरातून इस्रोला पाठिंबा मिळाला होता. दरम्यान, भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोनेचांद्रयान-2 मोहिमेला मिळालेल्या पाठिंब्यासाठी देशवासियांचे आभार मानले आहेत. तसेच जगभरात वसलेल्या भारतीयांची स्वप्ने साकार करण्यासाठी प्रयत्न करत राहू, असे आश्वासन दिले.
इस्रोने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून हे ट्विट केले आहे. ''आम्हाला पाठिंबा दिल्याबद्दल तुमचे आभार. जगभरातील भारतीयांच्या अपेक्षा आणि स्वप्नांच्या बळावर आम्ही सातत्याने पुढे जात राहू,'' असे इस्रोनो आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. चांद्रयान मोहिमेच्या 47 व्या दिवशी विक्रम लँडर चंद्राच्या पृष्टभागावर उतरणार होता. मात्र चंद्राच्या पृष्टभागापासून केवळ 2.1 किमी अंतरावर असताना त्याचा ऑर्बिटर आणि इस्रोशी असलेला संपर्क तुटला होता.
Thank you for standing by us. We will continue to keep going forward — propelled by the hopes and dreams of Indians across the world! pic.twitter.com/vPgEWcwvIa
— ISRO (@isro) September 17, 2019
पृथ्वीपासून चंद्रापर्यंतच्या आपल्या 47 दिवसांच्या प्रवासात चांद्रयान-2 ने अनेक अवघड टप्पे पार केले होते. मात्र मात्र शेवटचा टप्पा पार करताना विक्रम लँडरशी असलेला संपर्क तुटून त्याचे चंद्राच्या पृष्टभागावर हार्ड लँडिंग झाले होते. त्यानंतर चांद्रयान-2 च्या ऑर्बिटरने चंद्राच्या पृष्टभागावर पडलेल्या विक्रम लँडरचे छायाचित्र पाठवले होते. मात्र विक्रमशी संपर्क साधण्याचा सातत्याने प्रयत्न केल्यानंतरही त्यात अद्याप यश आलेले नाही.
विक्रमशी अद्याप संपर्क होऊ न शकल्याने विक्रम लँडरमध्ये असलेल्या रोव्हर प्रज्ञानच्या माध्यमातून चंद्राच्या पृष्टभागावरील माहिती मिळवण्याचा कार्यात अडचण निर्माण झाली आहे. मात्र असे असले तरी इस्रोसह जगभरातील अंतराळ संशोधन संस्थां आणि शास्रज्ञांनी चांद्रयान-2 मोहीम आपले 95 लक्ष्य प्राप्त करण्यात यशस्वी झाल्याचा दावा केला आहे.