Chandrayaan 2: लँडर विक्रमशी संपर्क न झाल्यास पुढे काय? जाणून घ्या इस्रोची योजना
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2019 10:27 AM2019-09-12T10:27:29+5:302019-09-12T10:30:09+5:30
पुढील योजनेवर इस्रोकडून काम सुरू
नवी दिल्ली: चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा पहिला देश होण्याची संधी भारताला थोडक्यात गमवावी लागली. विक्रम लँडरशी असलेला संपर्क तुटल्यामुळे इस्रोच्याचांद्रयान-2 मोहिमेला काहीसा धक्का बसला. मात्र यानंतरही इस्रोची मोहीम 90 ते 95 टक्के यशस्वी झाली आहे. ऑर्बिटर व्यवस्थित काम करत असल्यानं चंद्राबद्दलची महत्त्वपूर्ण माहिती इस्रोला मिळणार आहे. सध्या इस्रोकडून विक्रमशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
इस्रोचा विक्रम लँडरशी असलेला संपर्क सहा दिवसांपूर्वी तुटला. काही दिवसांपूर्वीच चंद्राभोवती परिक्रमा करणाऱ्या ऑर्बिटरनं विक्रमचे फोटो पाठवले. त्यामुळे विक्रमच्या ठावठिकाणाची माहिती इस्रोला मिळाली. मात्र अद्याप शास्त्रज्ञांना विक्रमशी संपर्क साधण्यात अपयश आल्यानं इस्रो पुढे काय करणार, असा प्रश्न अनेकांना पडला. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इस्रोनं याबद्दल विचार करण्यास सुरुवात केली आहे. विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरशी संपर्क साधण्यात अपयश आल्यास त्यांची अत्याधुनिक आवृत्ती चांद्रयान-3 मधून पाठवण्यात येईल.
चांद्रयान-2 मोहिमेतील अनुभवावरुन चांद्रयान-3 मधून पाठवण्यात येणाऱ्या लँडर आणि रोव्हरमध्ये अनेक बदल करण्यात येतील. चांद्रयान-3 मधील लँडर आणि रोव्हरमधील सेन्सर्स, कॅमेरे जास्त सक्षम असतील. याशिवाय नियंत्रण आणि संचार यंत्रणादेखील अत्याधुनिक असेल. चांद्रयान-3 च्या सर्व भागांमध्ये बॅकअप यंत्रणा लावली जाऊ शकते. काही अडचणी आल्यास या यंत्रणेचा वापर केला जाऊ शकतो.