Chandrayaan-2: 'ती' 15 मिनिटं श्वास रोखून धरायला लावणार!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2019 12:25 PM2019-07-22T12:25:23+5:302019-07-22T12:58:23+5:30
भारताची ‘चांद्रयान-2’ ही महत्त्वाकांक्षी अंतराळ मोहीम सोमवारी (22 जुलै) दुपारी होणाऱ्या प्रक्षेपणासाठी पूर्णपणे सज्ज असल्याचे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) जाहीर केले आहे.
नवी दिल्ली - भारताची ‘चांद्रयान-2’ ही महत्त्वाकांक्षी अंतराळ मोहीम सोमवारी (22 जुलै) दुपारी होणाऱ्या प्रक्षेपणासाठी पूर्णपणे सज्ज असल्याचे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) जाहीर केले आहे. ‘चांद्रयान-2’ मोहिमेवर जाणाऱ्या ‘जीएसएलव्ही-मार्क-3’ या शक्तिशाली रॉकेटचे दुपारी 2.43 वाजता श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ तळावरून प्रक्षेपण होणार आहे.
चंद्रावर पोहोचण्यासाठी यानाला 40 दिवसांपेक्षा अधिक कालावधी लागणार आहे. चंद्रावर उतरण्यापूर्वीची 15 मिनिटं यानासाठी सर्वाधिक आव्हानात्मक असणार आहेत. इस्रोचे प्रमुख के. सिवन यांनी लँडिंगच्या वेळची शेवटची 15 मिनिटं ही अधिक आव्हानात्मक असणार आहेत. कारण या कालावधीत आम्ही असे काही करणार आहोत जे यापूर्वी कधीही केलेले नाही असे म्हटले आहे. तसेच याआधी 15 जुलै रोजी ठरलेले प्रक्षेपण ज्या तांत्रिक अडचणीमुळे ऐन वेळी पुढे ढकलावे लागले होते, ती अडचण दूर करण्यात आली असून, रॉकेट प्रक्षेपणासाठी आता तयार आहे.
Indian Space Research Organisation (ISRO) to launch #Chandrayaan2 at 2:43 pm today from the Satish Dhawan Space Centre at Sriharikota. pic.twitter.com/ic4dvNUD1Y
— ANI (@ANI) July 22, 2019
के. सिवन यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'चंद्रापासून 30 किलोमीटर इतक्या अंतरावर गेल्यानंतर चांद्रयान-2 ची गती कमी करण्यात येणार आहे. विक्रमला चंद्राच्या भूमीवर उतरवणे अतिशय आव्हानात्मक असणार आहे. याच दरम्यानची 15 मिनिटं ही अत्यंत महत्त्वाची ठरणार आहेत. भारत पहिल्यादाच सॉफ्ट लँडिंग करणार आहे. केवळ इस्रोसाठीच नाही, तर संपूर्ण भारतीयांसाठीच ही 15 मिनिटं आव्हानात्मक असतील.' सॉफ्ट लँडिंग करण्यात भारत यशस्वी झाल्यास असे करणारा तो जगातील चौथा देश ठरणार आहे. आतापर्यंत अमेरिका, रशिया आणि चीन यामध्ये यशस्वी झाला आहे.
पृथ्वी आणि चंद्रादरम्यानचे अंतर हे 3 लाख 84 हजार किलोमीटर आहे. चांद्रयान-2 द्वारे लँडर विक्रम आणि रोव्हर प्रज्ञान चंद्रापर्यंत जातील. चंद्राच्या भूमीवर उतरण्यापूर्वी 4 दिवसाआधी रोव्हर 'विक्रम' उतरण्याच्या जागेची पाहणी करणे सुरू करेल. त्यानंतर लँडर यानापासून डिबूस्ट होईल. त्यानंतर विक्रम चंद्राच्या भूमीच्या अगदी जवळ पोहोचेल. जिथे उतरायचे आहे त्या जागेचे स्कॅनिंग सुरू होईल. त्यानंतर 6 ते 7 सप्टेंबरदरम्यान लँडिंगची प्रक्रिया सुरू होईल. लँडिंगनंतर लँडर विक्रमचा दरवाजा उघडेल. त्यानंतर रोव्हर प्रज्ञान बाहेर येईल. रोव्हर बाहेर येण्यासाठी सुमारे 4 तास लागतील. त्यानंतर तो वैज्ञानिक परिक्षणांसाठी चंद्राच्या भूमीवर चालू लागेल. 15 मिनिटांच्या आतमध्ये इस्रोला लँडिगचे फोटो मिळणे सुरू होईल.
Chandrayaan-2: खूशखबर... आधीपेक्षा अधिक वेगाने चंद्राकडे झेपावणार ‘चांद्रयान-2’ https://t.co/PffIjCf2og#Chandrayaan2
— Lokmat (@MiLOKMAT) July 22, 2019