Chandrayaan-2 : जाssदू... चंद्रावर उतरल्यानंतर प्रज्ञान रोव्हर 'असं' होणार चार्ज, 2 वर्षं फोटो पाठवणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2019 12:47 PM2019-09-06T12:47:44+5:302019-09-06T13:07:59+5:30

चांद्रयानापासून लँडर 'विक्रम' यशस्वीरित्या वेगळं झालं. त्यानंतर आता प्रज्ञान रोव्हर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार आहे.

Chandrayaan 2: Meet 'Pragyan' - India's rover set to explore the Moon | Chandrayaan-2 : जाssदू... चंद्रावर उतरल्यानंतर प्रज्ञान रोव्हर 'असं' होणार चार्ज, 2 वर्षं फोटो पाठवणार!

Chandrayaan-2 : जाssदू... चंद्रावर उतरल्यानंतर प्रज्ञान रोव्हर 'असं' होणार चार्ज, 2 वर्षं फोटो पाठवणार!

googlenewsNext
ठळक मुद्देचांद्रयानापासून लँडर 'विक्रम' यशस्वीरित्या वेगळं झालं. त्यानंतर आता प्रज्ञान रोव्हर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार आहे.चंद्रावर प्रज्ञान रोव्हरला सौर ऊर्जा मिळाली तर हे चार्ज होणार आहे. चार्ज झाल्यानंतर ते पृथ्वीवर दोन वर्ष फोटो पाठवणार आहे. 

नवी दिल्ली - अनेक महत्त्वाचे टप्पे पार पाडत भारताचे महत्त्वाकांक्षी ‘चांद्रयान-2’ अखेर चंद्राच्या जवळ पोहोचले आहे. शनिवारी (7 सप्टेंबर) 1.30 ते 2.30 दरम्यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरून हे इतिहास रचणार आहे. अतिशय अवघड असणाऱ्या या मोहिमेकडे साऱ्या जगाचे लक्ष लागून आहे. तसेच इस्रोच्या शास्त्रज्ञांचे मनोबल वाढविण्यासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. 2 सप्टेंबर रोजी चांद्रयानापासून लँडर 'विक्रम' यशस्वीरित्या वेगळं झालं. त्यानंतर आता प्रज्ञान रोव्हर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार आहे.

6 ते 7 सप्टेंबरदरम्यान लँडिंगची प्रक्रिया सुरू होईल. लँडिंगनंतर लँडर विक्रमचा दरवाजा उघडेल. त्यानंतर रोव्हर प्रज्ञान बाहेर येईल. रोव्हर बाहेर येण्यासाठी सुमारे 4 तास लागतील. त्यानंतर तो वैज्ञानिक परिक्षणांसाठी चंद्राच्या भूमीवर चालू लागेल. 15 मिनिटांच्या आतमध्ये इस्रोला लँडिगचे फोटो मिळणे सुरू होईल. इस्त्रोने दिलेल्या माहितीनुसार, 27 किलो वजन असलेलं प्रज्ञान रोव्हर हे 50W पॉवरने चालतं. यामध्ये दोन प्लेलोड्स लावण्यात आले आहेत. एक सेंटीमीटर प्रति सेकंद या वेगाने प्रज्ञान चालतं. मात्र यासाठी सौर ऊर्जेची गरज असणार आहे. चंद्रावरील एका दिवसाच्या प्रवासादरम्यान, त्याला पृथ्वीनुसार 14 दिवस स्वतः च्या ऊर्जेसह काम करावे लागणार आहे. जर तेथे सौर ऊर्जा मिळाली तर सर्वात कठीण परीक्षा देखील हे रोव्हर पास करणार आहे. चंद्रावर प्रज्ञान रोव्हरला सौर ऊर्जा मिळाली तर हे चार्ज होणार आहे. चार्ज झाल्यानंतर ते पृथ्वीवर दोन वर्ष फोटो पाठवणार आहे. 'कोई मिल गया' या चित्रपटातील जाssदू हे पात्र पृथ्वीवर आल्यावर त्याला चार्ज होण्यासाठी जशी सूर्याची गरज लागते. तशाच पद्धतीने प्रज्ञान रोव्हरला देखील चार्ज होण्यासाठी सौर ऊर्जेची गरज आहे.

प्रज्ञान रोव्हरमध्ये मिशन प्लेलोड्स लावण्यात आले आहेत. ज्यांना ऑर्बिटर प्लेलोड्स असं देखील म्हटलं जातं. तसेच यामध्ये असलेल्या टेरेन मॅपिंग कॅमेरा 2 चंद्राचं एक डिजिटल एलेवेशन मॉडेल पाठवणार आहे. ज्याच्या मदतीने चंद्रावरील अनेक रहस्य उलगडणार आहेत. 14.1 कोटी डॉलर खर्चाच्या या चांद्रयान-2 मोहिमेद्वारे चंद्राच्या जमिनीखालील खनिजांचा शोध घेण्यात येईल. या ग्रहाच्या पृष्ठभागाचा नकाशा तयार करणे, तेथे पाण्याचा शोध घेणे अशी कामे मानवरहित रोव्हर करणार आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर जिथे आतापर्यंत कोणताही देश पोहोचू शकलेला नाही तिथे भारताचा रोव्हर जाणार असल्याची माहिती इस्रोच्या सूत्रांनी याआधी दिली आहे.  

के. सिवन यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'चंद्रापासून 30 किलोमीटर इतक्या अंतरावर गेल्यानंतर चांद्रयान-2 ची गती कमी करण्यात येणार आहे. विक्रमला चंद्राच्या भूमीवर उतरवणे अतिशय आव्हानात्मक असणार आहे. याच दरम्यानची 15 मिनिटं ही अत्यंत महत्त्वाची ठरणार आहेत. भारत पहिल्यादाच सॉफ्ट लँडिंग करणार आहे. केवळ इस्रोसाठीच नाही, तर संपूर्ण भारतीयांसाठीच ही 15 मिनिटं आव्हानात्मक असतील.' सॉफ्ट लँडिंग करण्यात भारत यशस्वी झाल्यास असे करणारा तो जगातील चौथा देश ठरणार आहे. आतापर्यंत अमेरिका, रशिया आणि चीन यामध्ये यशस्वी झाला आहे. 

तुम्हीही होऊ शकता या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार 

इस्रोच्या अधिकृत वेबसाइटवर चांद्रयान 2 लँडिंगचे लाइव्ह स्ट्रीमिंग दाखविण्यात येईल. 

प्रेस इन्फॉर्मेशन ब्यूरो(PIB) च्या यू-ट्युब पेजवरून लाइव्ह स्ट्रीमिंग दाखवलं जाईल. 

दूरदर्शनच्या सर्व चॅनेलवर याचं लाइव्ह टेलिकास्ट करण्यात येईल.

 

Web Title: Chandrayaan 2: Meet 'Pragyan' - India's rover set to explore the Moon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.