Chandrayaan-2: इस्रोची महत्त्वाकांक्षी मोहीम 95% यशस्वी; जाणून घ्या कशी...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2019 04:00 PM2019-09-07T16:00:46+5:302019-09-07T16:02:41+5:30
विक्रम लँडरशी संपर्क तुटला असला तरीही भारताच्या हाती मोठं यश
बंगळुरू: इस्रोचा विक्रम लँडरशी असलेला संपर्क तुटल्यानं चांद्रयान-2 मोहिमेला धक्का बसला. जवळपास संपूर्ण मोहीम अगदी सुरळीत सुरू असताना अखेरच्या दोन मिनिटांमध्ये इस्रोच्या हाती निराशा आली. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा पहिला देश होण्याची संधी भारतासमोर होती. मात्र या यशानं इस्रोला थोडक्यात हुलकावणी दिली. मात्र यानंतरही इस्रोची महत्त्वाकांक्षी चांद्रयान मोहीम 95 टक्के यशस्वी झाली आहे.
इस्रोचा विक्रम लँडरशी असलेला संपर्क मध्यरात्री तुटला. विक्रमचं सॉफ्ट लँडिंग अपयशी ठरल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र विक्रमच्या लँडिंगआधीच भारताला बरंच मोठं यश मिळालं. चंद्राच्या कक्षेत असलेलं इस्त्रोचं ऑर्बिटर व्यवस्थित काम करत असल्यानं चांद्रयान-2 मोहीम 95 टक्के यशस्वी झाल्याचं मत इस्रोचे माजी प्रमुख जी. माधवन यांनी व्यक्त केलं. चंद्रापासून 2.1 किलोमीटर अंतरावर असेपर्यंत लँडर विक्रम संपर्कात होतं. मात्र त्यानंतर विक्रम आणि इस्त्रोचा संपर्क तुटला.
चंद्रायान-2 चं ऑर्बिटर अगदी योग्य ठिकाणी असून त्याचं काम अतिशय योग्य पद्धतीनं सुरू असल्याचं माधवन म्हणाले. 'आपण फार चिंता करू नये असं मला वाटतं. चांद्रयान-2 नं त्याचं 95 टक्के काम केलेलं आहे. चंद्राबद्दलची महत्त्वपूर्ण माहिती पाठवण्याचं काम ऑर्बिटर व्यवस्थित पार पाडेल,' असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. याशिवाय विक्रमनं हार्ड लँडिंग केलं असलं, तरी त्यावरील बाह्य उपकरणांनी त्याची निरीक्षणं घेता येतील. यामध्ये लेजर मिरर, सिसमोग्राफ, उच्च दर्जाच्या कॅमेऱ्यांचा समावेश आहे. चंद्राभोवती फिरणाऱ्या यानातूनही अधिकची माहिती मिळेल.
चंद्र आणि पृथ्वी यांच्यातलं अंतर तब्बल 3,84,400 किलोमीटर इतकं आहे. चांद्रयान-2 मधील विक्रम लँडरचा संपर्क चंद्रापासून 2.1 किमी अंतरावर असताना तुटला. चांद्रयान-2नं यशस्वीपणे कापलेलं हे अंतर विचारात घेतल्यास इस्रोच्या यशाची कल्पना येऊ शकेल. त्यामुळे इस्रोच्या शास्त्रज्ञांची कामगिरी नक्कीच देशवासीयांची मान अभिमानानं उंचावणारी आहे.