Chandrayaan-2 : ...म्हणून ‘चांद्रयान-2’ च्या लँडिंगसाठी दक्षिण ध्रुवाची केली निवड
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2019 01:44 PM2019-07-22T13:44:51+5:302019-07-22T14:00:09+5:30
चांद्रयान-2 हे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार आहे. मात्र दक्षिण ध्रुवाची निवड का करण्यात आली हे फार कमी जणांना माहीत आहे.
नवी दिल्ली - अंतराळ संशोधनात मोठी झेप घेण्यासाठी भारत सज्ज झाला आहे. भारताची ‘चांद्रयान-2’ ही महत्त्वाकांक्षी अंतराळ मोहीम सोमवारी (22 जुलै) दुपारी होणाऱ्या प्रक्षेपणासाठी पूर्णपणे सज्ज असल्याचे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) जाहीर केले आहे. ‘चांद्रयान-2’ मोहिमेवर जाणाऱ्या ‘जीएसएलव्ही-मार्क-3’ या शक्तिशाली रॉकेटचे दुपारी 2.43 वाजता श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ तळावरून प्रक्षेपण होणार आहे. चांद्रयान-2 हे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार आहे. मात्र दक्षिण ध्रुवाची निवड का करण्यात आली हे फार कमी जणांना माहीत आहे.
इस्रोने दिलेल्या माहितीनुसार, चांद्रयान-2 हे चंद्रावरील भौगोलिक वातावरण, खनिजं आणि पाणी यासंदर्भातील माहिती देणार आहे. मिशन मून अंतर्गत चांद्रयान-2 हे अजुनही फारसे संशोधन न झालेल्या चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरविणार आहे. चंद्राचा विषुववृत्तीय प्रदेश इतर भागाच्या तुलनेत थोडा सपाट असल्याने या प्रदेशामध्ये चांद्रयान उतरली आहेत. मात्र चंद्राचा दक्षिण ध्रुव दऱ्याखोऱ्यांचा आणि खडबडीत पृष्ठाचा आहे. त्यामुळे आतापर्यंत या ध्रुवावर कोणताही देश गेलेला नाही. त्यामुळे दक्षिण ध्रुवाबाबतची अधिक माहिती अद्याप समोर आलेली नाही. चंद्रावरील भौगोलिक वातावरण, खनिजं आणि पाणी यासंदर्भातील माहिती जाणून घेण्यासाठी दक्षिण ध्रुवाची निवड ही लँडिंगसाठी करण्यात आली आहे.
भारताच्या चांद्रयान-1 दरम्यान दक्षिण ध्रुवावर असलेल्या बर्फासंबंधित काही माहिती मिळाली होती. तेव्हापासून चंद्राच्या दक्षिण ध्रुवाबाबत कुतूहल निर्माण झाले आहे. सॉफ्ट लँडिंग करण्यात भारत यशस्वी झाल्यास असे करणारा तो जगातील चौथा देश ठरणार आहे. आतापर्यंत अमेरिका, रशिया आणि चीन यामध्ये यशस्वी झाला आहे. चंद्राचा पृष्ठभाग, चंद्राचा गाभा आणि बाह्य वातावरणाचा अभ्यास करून चंद्रावरील पाण्याचे मूळ शोधून काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. दक्षिण ध्रुवावरील भूरचना, खनिज, त्याच्या बाह्य वातावरणाचा अभ्यास करणं तसेच तेथे कोणत्या स्वरूपात पाणी उपलब्ध आहे की नाही याबाबत माहिती मिळणार आहे.
Chandrayaan-2: मिशनमधील 'ती' 15 मिनिटं असणार अत्यंत आव्हानात्मकhttps://t.co/y8l3pbRF4Y#Chandrayaan2
— Lokmat (@MiLOKMAT) July 22, 2019
Chandrayaan-2: 'ती' १५ मिनिटं श्वास रोखून धरायला लावणार!
चंद्रावर पोहोचण्यासाठी यानाला 40 दिवसांपेक्षा अधिक कालावधी लागणार आहे. चंद्रावर उतरण्यापूर्वीची 15 मिनिटं यानासाठी सर्वाधिक आव्हानात्मक असणार आहेत. इस्रोचे प्रमुख के. सिवन यांनी लँडिंगच्या वेळची शेवटची 15 मिनिटं ही अधिक आव्हानात्मक असणार आहेत. कारण या कालावधीत आम्ही असे काही करणार आहोत जे यापूर्वी कधीही केलेले नाही असे म्हटले आहे. तसेच याआधी 15 जुलै रोजी ठरलेले प्रक्षेपण ज्या तांत्रिक अडचणीमुळे ऐन वेळी पुढे ढकलावे लागले होते, ती अडचण दूर करण्यात आली असून, रॉकेट प्रक्षेपणासाठी आता तयार आहे. के. सिवन यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'चंद्रापासून 30 किलोमीटर इतक्या अंतरावर गेल्यानंतर चांद्रयान-2 ची गती कमी करण्यात येणार आहे. विक्रमला चंद्राच्या भूमीवर उतरवणे अतिशय आव्हानात्मक असणार आहे. याच दरम्यानची 15 मिनिटं ही अत्यंत महत्त्वाची ठरणार आहेत. भारत पहिल्यादाच सॉफ्ट लँडिंग करणार आहे. केवळ इस्रोसाठीच नाही, तर संपूर्ण भारतीयांसाठीच ही 15 मिनिटं आव्हानात्मक असतील.'
Chandrayaan-2: खूशखबर... आधीपेक्षा अधिक वेगाने चंद्राकडे झेपावणार ‘चांद्रयान-2’ https://t.co/PffIjCf2og#Chandrayaan2
— Lokmat (@MiLOKMAT) July 22, 2019
पृथ्वी आणि चंद्रादरम्यानचे अंतर हे 3 लाख 84 हजार किलोमीटर आहे. चांद्रयान-2 द्वारे लँडर विक्रम आणि रोव्हर प्रज्ञान चंद्रापर्यंत जातील. चंद्राच्या भूमीवर उतरण्यापूर्वी 4 दिवसाआधी रोव्हर 'विक्रम' उतरण्याच्या जागेची पाहणी करणे सुरू करेल. त्यानंतर लँडर यानापासून डिबूस्ट होईल. त्यानंतर विक्रम चंद्राच्या भूमीच्या अगदी जवळ पोहोचेल. जिथे उतरायचे आहे त्या जागेचे स्कॅनिंग सुरू होईल. त्यानंतर 6 ते 7 सप्टेंबरदरम्यान लँडिंगची प्रक्रिया सुरू होईल. लँडिंगनंतर लँडर विक्रमचा दरवाजा उघडेल. त्यानंतर रोव्हर प्रज्ञान बाहेर येईल. रोव्हर बाहेर येण्यासाठी सुमारे 4 तास लागतील. त्यानंतर तो वैज्ञानिक परिक्षणांसाठी चंद्राच्या भूमीवर चालू लागेल. 15 मिनिटांच्या आतमध्ये इस्रोला लँडिगचे फोटो मिळणे सुरू होईल.