Chandrayaan 2: प्रिय इस्रो प्रमुख के. शिवन यांस...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2019 05:51 PM2019-09-07T17:51:51+5:302019-09-07T17:54:45+5:30
अपयशानं उदास होऊ नका शिवन सर, मोठं यश तुमची वाट पाहतंय
प्रिय के. शिवन्,
इस्रो चिफ....
मान खाली नको सर,
मान कायम ताठ ठेवा!
खरंच सांगतो आज तुमचा,
देवालाही वाटेल हेवा!
के. शिवन् शास्त्रज्ञ पण,
देव मानतोय प्रत्येक भारती!
गाभाऱ्याकडे पाठ फिरवून,
तुमच्यासमोर करतोय आरती!
दिसत नाही तिथे पोचणं,
काम अब्जात एकाचं!
म्हणून मस्तक ताठ हवं,
देशाच्या या लेकाचं!
बंदरात येऊन जहाज बुडणं,
नाविकाला नक्कीच छळतं!
पण् बंदरावरती घेऊन आला ,
फक्त अथांगालाच कळतं!
तुमची मान झुकली म्हणून,
अख्खा देश रडला आहे!
तुमच्या डोळ्यात पूर्ण भारत,
अश्रू होऊन दडला आहे!
तुमची मान खाली बघून,
साक्षात यश रडते आहे!
तुमच्या हातून काहीतरी,
खरंच अद्भूत घडते आहे!
डोळ्यामधलं आजचं पाणी,
उद्या ठरेल स्टीम पॉवर!
तेव्हा सांगतो साक्षात् अमृत,
तीर्थ बनून होईल शॉवर!
शिवन् सर, तुमची मान,
शारदेचं प्रतिक आहे!
तुमची झेप अलौकिकच,
पंख जरी लौकिक आहे!
चंद्र सोडाच,मंगळ-गुरू,
तुमच्या कक्षेत फिरू लागतील!
तुमच्याच लँडरमधे तिथली,
माती, जीव शिरू लागतील!
तो दिवस दूर नाही,
फक्त आधी पुसा पापणी!
नऊ ग्रह गाऊ लागतील,
एका सुरात "इस्रो-गाणी!"
- प्रमोद जोशी, देवगड