Chandrayaan 2: चंद्र अवघा 2 किमीवर असताना 'विक्रम'ला नेमकं काय झालं?; तीन कारणांमुळे चुकू शकतं लँडिंग!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2019 01:25 PM2019-09-13T13:25:49+5:302019-09-13T13:31:56+5:30

विक्रमशी संपर्क साधण्यासाठी इस्रोचे प्रयत्न सुरू

chandrayaan 2 three reasons why lander vikram landing failed | Chandrayaan 2: चंद्र अवघा 2 किमीवर असताना 'विक्रम'ला नेमकं काय झालं?; तीन कारणांमुळे चुकू शकतं लँडिंग!

Chandrayaan 2: चंद्र अवघा 2 किमीवर असताना 'विक्रम'ला नेमकं काय झालं?; तीन कारणांमुळे चुकू शकतं लँडिंग!

Next

नवी दिल्ली: विक्रम लँडरचा इस्रोशी असलेला संपर्क गेल्या आठवड्यात तुटला. त्यावेळी विक्रम चंद्रापासून अवघ्या २.१ किलोमीटर अंतरावर होतं. यानंतर इस्रोच्या ऑर्बिटरनं विक्रमचा फोटो टिपला. मात्र अद्याप विक्रमशी संपर्क होऊ शकलेला नाही. त्यासाठीचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती इस्रो प्रमुख के. सिवन यांनी दिली. इस्रोसोबतच नासादेखील विक्रमशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे. या पार्श्वभूमीवर इस्रोच्या अहमदाबादमधील स्पेस ऍप्लिकेशन सेंटरचे माजी संचालक तपन मिश्रा यांनी विक्रम लँडरच्या अपयशी लँडिंगमागील कारणांवर भाष्य केलं आहे. 

१. थ्रस्टर्स योग्य वेळी एकत्र सुरू झाली नसावीत
विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागापासून ३० किलोमीटर अंतरावर असताना त्याचा वेग १.६६ किमी प्रति सेकंद इतका होता. पृष्ठभागावर उतरताना त्याचा वेग २ मीटर प्रति सेकंद असणं गरजेचं होतं. विक्रम लँडरमध्ये पाच मोठे थ्रस्टर्स आहेत. हे थ्रस्टर्स त्याला लँडिगमध्ये मदत करणार होते. याशिवाय विक्रम लँडरवर ८ लहान थ्रस्टर्स आहेत. लहान रॉकेटसारखे दिसणारे हे थ्रस्टर्स लँडरला मागे-पुढे नेण्यात मदत करतात. 



विक्रम लँडरच्या खाली पाच मोठे थ्रस्टर्स आहेत. यातील चार थ्रस्टर्स चार कोपऱ्यांना आहेत. तर एक थ्रस्टर मध्यभागी आहे. तर आठ लहान थ्रस्टर्स विक्रमला दिशा देण्याचं काम करतात. चंद्राच्या पृष्ठभागावर उतरताना या थ्रस्टर्समध्ये एकाचवेळी इंधन पोहोचलं नसावं, अशी शक्यता मिश्रा यांनी व्यक्त केली. इंधन न पोहोचल्यानं सर्व थ्रस्टर्स एकाचवेळी सुरू झाले नसावेत, असंदेखील ते म्हणाले. 



२. योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात इंधन पोहोचलं नसावं
विक्रममध्ये इंधनाची मोठी टाकी आहे. विक्रमचा वेग, चंद्राजवळ गेल्यावर लावण्यात आलेला ब्रेक यामुळे टाकीतलं इंधन हललं असावं, अशी शक्यता मिश्रा यांनी वर्तवली. टाकी हलल्यानं इंधन इंजिनापर्यंत व्यवस्थित पोहोचलं नसावं. त्यामुळे थ्रस्टर्सला पुरेसं इंधन न मिळाल्यानं लँडिंगमध्ये अडचणी आल्या असाव्यात, असं मिश्रा म्हणाले.



३. चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाचा परिणाम झाल्याची शक्यता
विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागापासून १०० मीटरवर गेल्यानंतर त्यानं हेलिकॉप्टरप्रमाणे घिरट्या घालणं अपेक्षित होतं. यावेळी चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाचा सामना करण्यासाठी लहान थ्रस्टर्स सुरू राहणार होते. लँडरमधील कॅमेरा लँडिगासाठी योग्य जागा शोधून त्या जागेचा फोटो ऑनबोर्ड कॉम्प्युटरला पाठवणार होता. लँडरनं पाठवलेला फोटो आणि कॉम्प्युटरमधील फोटो जुळल्यानंतर विक्रम चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार होतं. लँडरच्या घिरट्या बंद होऊन थ्रस्टर्सच्या मदतीनं ते खाली उतरणं अपेक्षित होतं. यामध्ये विक्रम लँडरमधील रडार महत्त्वाची भूमिका बजावणार होतं. यावेळी गुरुत्वाकर्षणाचा अंदाज चुकला असावा, अशी शक्यता मिश्रा यांनी व्यक्त केली. 
 

Web Title: chandrayaan 2 three reasons why lander vikram landing failed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.