Chandrayaan 2 : जाणाऱ्या वेळेसोबत धूसर होतेय विक्रमशी संपर्काची आस
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2019 10:09 PM2019-09-13T22:09:03+5:302019-09-13T22:10:23+5:30
भारताच्या चांद्रयान-2 मोहिमेदरम्यान चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करताना विक्रम लँडरचा संपर्क तुटला होता. तेव्हापासून या विक्रमशी संपर्क प्रस्थापित करण्यासाठी इस्रोकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत.
बंगळुरू - भारताच्याचांद्रयान-2 मोहिमेदरम्यान चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करताना विक्रम लँडरचा संपर्क तुटला होता. तेव्हापासून या विक्रमशी संपर्क प्रस्थापित करण्यासाठी इस्रोकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. मात्र जवळपास आठवडाभराचा अवधी निघून गेल्यानंतर आता हळुहळू विक्रमशी पुन्हा संपर्क प्रस्थापित होण्याची आशा धुसर होत चालली आहे. त्यामुळे आता चंद्राच्या पृष्टभारावर हार्ड लँडिंग होऊन पडलेल्या विक्रमशी संपर्क साधण्याचा शेवटचा प्रयत्न इस्रोकडून सुरू आहे.
चंद्राच्या पृष्टभागावर विक्रमचे सॉफ्ट लँडिग झाले असते तर त्यामधून रोव्हर बाहेर आला असता. तसेत त्यामाध्यमातून चंद्राच्या पृष्टभागावर काही शास्त्रीय प्रयोग करता आले असते. लँडर विक्रमला चंद्राच्या पृष्टभागावर सॉफ्ट लँडिग करण्याच्या दृष्टीने विकसित करण्यात आले होते. तसेच लँडरच्या आत असलेल्या रोव्हरचे कार्यकाळ 1 चांद्र दिवस म्हणजे पृथ्वीवरील 14 दिवस एवढे निश्चित करण्यात आले होते. सात सप्टेंबर रोजी लँडर विक्रम चंद्राच्या पृष्टभागावर सॉफ्ट लँडिंग करण्यात अपयशी ठरला होता. तेव्हापासून जवळपास एक आठवडा उलटल्याने आता विक्रमशी संपर्क प्रस्थापित करण्यासाठी केवळ एक आठवड्याचा अवधी उरला आहे.
विक्रमचे हार्डलँडिंग झाल्यानंतर चांद्रयान-2 च्या ऑर्बिटरने विक्रमचा शोध घेतला होता. तसेच त्याचे थर्मल छायाचित्रसुद्धा पाठवले होते. तेव्हापासून विक्रमशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू आहे. यासंदर्भात इस्रोच्या एका शास्त्रज्ञाने सांगितले की, निघून जात असलेल्या वेळासोबत काम अधिकाधिक कठीण होत चालले आहे. बॅटरीमधील उर्जा संपत चालली असेल. त्यानंतर विक्रमला ऊर्जा मिळवण्यात आणि कार्य सुरू ठेवण्यात अडचणी येत असतील.''
दरम्यान, हार्ड लँडिंगदरम्यान, विक्रम लँडरला नुकसान झाले असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच हार्ड लँडिंगमुळे लँडर अशा दिशेने पडले असावे जिथून त्याल्या सिग्नल मिळणे अशक्य झाले आहे, असेही सांगण्यात येत आहे.