Chandrayaan-2: ...तर विक्रम स्वत:च्या पायावर उभं राहणार; इस्रो इतिहास रचणार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2019 11:46 AM2019-09-09T11:46:11+5:302019-09-09T11:53:50+5:30
विक्रमशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू
नवी दिल्ली: इस्रोचीचांद्रयान-2 मोहीम पूर्णपणे यशस्वी होण्याची आशा अद्यापही कायम आहे. चंद्रापासून 2.1 किलोमीटर अंतरावर गेल्यावर लँडर विक्रमशी तुटलेला संपर्क पुन्हा प्रस्थापित केला जाऊ शकतो. विक्रमचं सॉफ्ट लँडिंग अपयशी ठरलं असलं, तरीही ते स्वत:च्या पायावर उभं राहू शकतं. इस्रोला विक्रमशी संपर्क साधण्यात यश आल्यास भारताच्या नावावर ऐतिहासिक कामगिरीची नोंद होईल.
चांद्रयान-2 च्या लँडर विक्रममध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान असल्याची माहिती इस्रोतील विश्वसनीय सूत्रांनी दिली. या तंत्रज्ञानामुळे विक्रम लँडर स्वत:हून उभं राहू शकतं. मात्र त्यासाठी प्रथम विक्रमशी संपर्क प्रस्थापित व्हायला हवा. विक्रमशी संपर्क साधण्यात यश आल्यास त्याला इस्रोकडून सूचना पाठवल्या जाऊ शकतात. त्यानंतर विक्रम स्वत:हून चंद्राच्या पृष्ठभागावर उभं राहू शकेल.
लँडर विक्रममध्ये ऑनबोर्ड कॉम्प्युटर आहे. त्यामुळे विक्रम अनेक काम स्वत:हून करतं. विक्रमचं सॉफ्ट लँडिंग अपयशी ठरल्यानं त्याचा एँटिना दबला आहे. त्यामुळे त्याच्याशी संपर्क साधण्यात अडचणी येत आहेत. या एँटिनाच्या माध्यमातून संपर्क साधण्यासाठी इस्रोचे प्रयत्न सुरू आहेत. यात यश आल्यास विक्रमला सूचना पाठवल्या जाऊ शकतील. त्यामुळे विक्रम स्वत:च्या पायावर उभं राहू शकेल.
विक्रममध्ये कोणतं तंत्रज्ञान? ते कसं काम करतं?
इस्रोतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लँडर विक्रमच्या खालील भागात पाच थ्रस्टर्स आहेत. याच थ्रस्टर्सच्या मदतीनं चंद्रावर सॉफ्ट लँडिंग केलं जाणार होतं. याशिवाय इस्रोच्या चारही बाजूंना थ्रस्टर्स आहेत. याच थ्रस्टर्सनी अंतराळात विक्रमला दिशा देण्याचं काम केलं. हे चारही थ्रस्टर्स अद्याप सुरक्षित आहेत. सध्या लँडरवरील कम्युनिकेशन एँटिना दबलेल्या अवस्थेत आहे. त्याही भागात थ्रस्टर्स आहेत.
इस्रोच्या ग्राऊंड स्टेशनवरुन पाठवण्यात आलेल्या सूचना ऑर्बिटरच्या माध्यमातून एँटिनापर्यंत पोहोचल्यास थ्रस्टर्स ऑन होऊ शकतात. त्यानंतर विक्रम स्वत:च्या पायावर उभं राहू शकेल. इस्रो यामध्ये यशस्वी ठरल्यास चांद्रयान-2 मोहिमेसंदर्भातील सर्व प्रयोग ठरल्याप्रमाणे करणं शक्य होईल. यामुळे इस्रोच्या नावावर ऐतिहासिक कामगिरीची नोंद होईल. चंद्राच्या दक्षिण धुव्रावर उतरणारा पहिला देश होण्याचा मान यामुळे भारताला मिळेल.