चांद्रयान-२ आज चंद्राच्या कक्षेत करणार प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2019 05:40 AM2019-08-20T05:40:58+5:302019-08-20T05:45:01+5:30
इस्रोने स्पष्ट केलेले आहे की, चांद्रयान २ च्या सर्व प्रक्रिया सामान्यपणे पार पडत आहेत. चंद्राच्या दक्षिण धु्रवावर यानिमित्ताने प्रकाश पडणार आहे.
बंगळुरू : देशाच्या चांद्रयान २ मिशनसाठी मंगळवारी अतिशय महत्त्वाची घटना घडणार आहे. चांद्रयान २ चे रॉकेट इंजिन चंद्राच्या कक्षेत पोहोचविण्याची मोहीम आज फत्ते करण्यात येणार आहे.
इस्रोचे अध्यक्ष के. सिवन यांनी सांगितले की, मंगळवारी सकाळी ८.३० ते ९.३० च्या दरम्यान ही प्रक्रिया होणार असून, ती आव्हानात्मक आहे. त्यानंतर लँडर विक्रम २ सप्टेंबर रोजी आॅर्बिटरपासून वेगळे होईल. ७ सप्टेंबर रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग करण्याची प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी लँडरसंबंधी दोन कौशल्यपूर्ण प्रक्रिया करण्यात येणार आहेत.
२२ जुलै रोजी चांद्रयान २ झेपावले होते. १४ आॅगस्ट रोजी पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडत ते चंद्र पथाच्या दिशेने पुढे सरकत होते. बंगळुरूस्थित केंद्रातून या यानाच्या स्थितीवर नजर ठेवली जात आहे.
इस्रोने स्पष्ट केलेले आहे की, चांद्रयान २ च्या सर्व प्रक्रिया सामान्यपणे पार पडत आहेत. चंद्राच्या दक्षिण धु्रवावर यानिमित्ताने प्रकाश पडणार आहे.
- चंद्राच्या दिशेने सुरू केलेला हा भारताचा ऐतिहासिक प्रवास आहे. चांद्रयान २ हे देशाचे सर्वात शक्तिशाली रॉकेट जीएसएलव्ही एमकेद्वारे प्रक्षेपित करण्यात आलेले आहे. प्रक्षेपणानंतर अवघ्या १६ मिनिटांत ते पृथ्वीच्या कक्षेत स्थिरावले होते.