‘चंद्रयान-३’चे जगभरातून काैतुक, आता नजर लॅंडिंगवर...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2023 05:37 AM2023-07-16T05:37:19+5:302023-07-16T05:38:15+5:30
चंद्रावर उमटणार भारताचे राष्ट्रीय चिन्ह, इस्रोच्या बोधचिन्हाच्या मुद्रा
नवी दिल्ली : भारताच्या यशस्वी चंद्रयान प्रक्षेपणाचे जगभरातून कौतुक होत आहे. भारताच्या या यशाबद्दल अनेक देशांनी आनंद व्यक्त केला आहे. अमेरिका, जपान, ब्रिटन आणि युरोपच्या अंतराळ संस्थांनी इस्रोचे अभिनंदन केले आहे. चिनी वृत्तपत्र ‘ग्लोबल टाइम्स’नेही प्रक्षेपणाचा व्हिडीओ शेअर करून भारताचे कौतुक केले आहे.आंध्र प्रदेशच्या श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून एलव्हीएम३-एम४ राॅकेटद्वारे चंद्रयान-३ अवकाशात पाठवण्यात आले. यानाने चंद्राच्या दिशेने प्रवास सुरू केला आहे. जर सर्वकाही योजनेनुसार झाले तर ते २३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५:४७ वाजता चंद्रावर उतरेल, असे इस्रोचे प्रमुख एस.सोमनाथ यांनी प्रक्षेपणानंतर सांगितले.
अभिनंदनाचा वर्षाव
nचिनी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सने ट्वीट करून म्हटले की, ‘अभिनंदन! भारताने चंद्रयान-३ यशस्वीरीत्या कक्षेत प्रक्षेपित केले आहे. हे यान ऑगस्टमध्ये चंद्रावर सॉफ्ट लँडिंगचा अर्थात उतरण्याचा प्रयत्न करेल.
nया प्रयत्नात भारत यशस्वी झाल्यास चंद्रावर नियंत्रित पद्धतीने उतरणारा तो चौथा देश ठरेल. ‘चंद्रयान-३’ चे प्रक्षेपण भारतासाठी अभिमानाची बाब असल्याचे न्यूयॉर्क टाइम्सने लिहिले आहे. याशिवाय ‘द गार्डियन’ने या अंतराळ मोहिमेचे ऐतिहासिक मोहीम असे वर्णन केले आहे.
भारतीयांसाठी महत्त्वाचा क्षण
यशस्वी प्रक्षेपण हा प्रत्येक भारतीयासाठी महत्त्वाचा क्षण होता, असे प्रख्यात तबलावादक उस्ताद झाकिर हुसेन यांनी म्हटले. प्रक्षेपण म्हणजे दक्षिण आशियामध्ये भारताची आर्थिक व वैज्ञानिक सामर्थ्य वाढत असल्याचा पुरावा आहे. भारत हा जगातील महाशक्तींपैकी एक असल्याचे अशा मोहिमांतून सिद्ध होणार आहे, असेही ते म्हणाले.
मला आशा आहे की, चंद्रयान-३ चा चंद्रापर्यंतचा प्रवास सुरक्षित आहे. आम्ही या मोहिमेतून प्राप्त होणाऱ्या वैज्ञानिक निष्कर्षांची वाट पाहत आहोत.
- बिल निल्सन, प्रशासक, नासा
पाककडूनही अभिनंदन
पाकिस्तानातील पीटीआय पक्षाचे नेते फवाद चौधरी यांनीही भारत व इस्रोचे अभिनंदन केले आहे. फवाद हे पाकिस्तानचे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री राहिले आहेत.
जपान अंतराळ संशोधन संस्थेने ‘आम्हाला आशा आहे की चंद्रयान-३ चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करण्यात यशस्वी होईल’ असे ट्वीट केले.
ब्रिटनच्या अंतराळ संस्थेने ट्वीट केले की, गंतव्य चंद्र आहे. चंद्रयानाच्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल इस्रोचे अभिनंदन. युरोपियन अंतराळ संस्थेनेही इस्रोचे अभिनंदन केले.
चंद्रावर उमटणार भारताचे राष्ट्रीय चिन्ह, इस्रोच्या बोधचिन्हाच्या मुद्रा
सहा चाकांचे लँडर व प्रज्ञान हा रोव्हर २३ ऑगस्ट रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार आहे. सम्राट अशोक यांची राजधानी असलेल्या सारनाथ येथील सिंहांचे शिल्प हे भारताचे राष्ट्रीय चिन्ह आहे. ते व इस्रोचे बोधचिन्ह प्रज्ञान रोव्हरच्या मागच्या चाकांवर कोरण्यात आले आहे. रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल व तिथे चालायला लागेल त्यावेळी चाकांवर कोरलेले भारताचे राष्ट्रीय चिन्ह, इस्रोचे बोधचिन्ह चंद्रावर उमटणार आहेत. यासंदर्भात इस्रोने नमुन्यादाखल एक व्हिडीओ चंद्रयान-३चे प्रक्षेपण होण्याआधी तयार केला असून तो व्हायरल झाला आहे.