भारताने 615 कोटींमध्ये बनवले चंद्रयान-3; Elon Musk आकारतात 900 कोटी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2023 01:39 PM2023-07-14T13:39:40+5:302023-07-14T16:17:56+5:30
Chandrayaan 3: इलॉन मस्क पहिले व्यक्ती आहेत, ज्यांनी खाजगी अंतराळ पर्यटन सेवा सुरू केली आहे.
Chandrayaan 3:भारत आणि भारतीयांसाठी आजचा दिवस खूप मोठा आहे. आज भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच Isro च्या महत्वकांशी चंद्रयान-3 चे प्रक्षेपण होणार आहे. चंद्रयान-3 ची फक्त भारतातच नाही, तर जगभर चर्चा आहे. एकीकडे इतर देश अंतराळ मोहिमांसाठी हजारो कोटी रुपये खर्च करतात, तर दुसरीकडे भारत फक्त 615 कोटी रुपयांमध्ये चंद्रावर आपले यान पाठवत आहे. सुमारे 50 दिवसांच्या प्रवासानंतर हे यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार आहे.
चंद्रयान-3 च्या खर्चाबद्दल आम्ही तुम्हाला माहिती दिली, आता अजून एक मजेशीर गोष्ट सांगणार आहोत. सध्या अंतराळ क्षेत्रात सर्वात मोठे नाव इलॉन मस्क (Elon Musk) यांच्या स्टारलिंक आणि स्पेसएक्स कंपनीचे आहे. इलॉन मस्क हे पहिले व्यक्ती आहेत, ज्यांनी खाजगी अंतराळ पर्यटन (Space Tourism) सेवा सुरू केली आहे. या अंतराळ पर्यटनासाठी मस्क भरपूर पैसे आकारतात. भारताच्या चंद्रयान-3 च्या संपूर्ण बजेटपेक्षा जास्त मस्क यांच्या कंपनीच्या अंतराळ प्रवासाचा खर्च आहे.
प्रवासाचा खर्च किती?
आम्ही तुम्हाला यापूर्वी सांगिल्यानुसार, भरताच्या चंद्रयान-3 चे बजेट सुमारे 615 कोटी आहे. इस्रोने या मोहिमेसाठी 600 कोटी रुपयांचे बजेट काढले होते, पण नंतर त्यात 15 कोटींची वाढ झाली. आता स्पेसएक्स-स्टारलिंकच्या अंतराळ प्रवासाच्या खर्चाबद्दल बोलायचे झाले, तर हे चंद्रयान-3 च्या बजेटपेक्षा जास्त आहे. अंतराळ प्रवास घडवण्यासाठी इलॉन मस्क यांची कंपनी एका व्यक्तीकडून 55 मिलियन(450 कोटी रुपये) आकारते. तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत जायचे असेल, तर तुम्हाला 110 मिलियन, म्हणजेच 900 कोटी रुपये मोजावे लागतील.