Chandrayaan-3 :भारताकडे आहे चंद्राचा एक दुर्मीळ तुकडा, कडेकोट सुरक्षेत इथे ठेवलाय जपून
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2023 03:32 PM2023-08-23T15:32:22+5:302023-08-23T15:40:22+5:30
Chandrayaan-3: भारताने चंद्रावर पाठवलेलं चांद्रयान-३ आज चंद्रावर उतरणार आहे. आज संध्याकाळी सहा वाजता चांद्रयान-३ मधील विक्रम लँडर चंद्राच्या पृष्टभागावर उतरण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे सगळ्या देशवासियांच्या नजरा आता चंद्राकडे वळलेल्या आहेत.
भारताने चंद्रावर पाठवलेलं चांद्रयान-३ आज चंद्रावर उतरणार आहे. आज संध्याकाळी सहा वाजता चांद्रयान-३ मधील विक्रम लँडर चंद्राच्या पृष्टभागावर उतरण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे सगळ्या देशवासियांच्या नजरा आता चंद्राकडे वळलेल्या आहेत. चंद्रावर पहिलं पाऊल हे अमेरिकेच्या नासा या संशोधन संस्थेचे अंतराळवीर नील आर्मस्ट्राँग यांनी ठेवलं होतं हे सर्वांनाच माहिती आहे. मात्र नील आर्मस्ट्राँग आणि त्यांचे सहकारी एडविन एल्ड्रिच यांनी चंद्रावरून परत येताना तिथल्या दगड मातीचे काही नमुने पृथ्वीवर आणले होते, हे फारच थोड्या लोकांना माहिती असेल. नासाने अभ्यास करण्यासाठी यामधील दगडांचे काही नमुने जगातील विविध देशांना दिले आहेत. यामधील एक तुकडा भारतालाही देण्यात आला होता.
चंद्रावरून आणलेल्या दगडांमधील एका दगडाचा हा तुकडा मुंबईमधील टाटा इन्स्टिट्युट ऑफ फंडामेंटल रिसर्च (TIFR) येथे सुरक्षित ठेवण्यात आला आहे. तेव्हापासून या तुकड्यावर अनेक शास्त्रज्ञांनी संशोधन केलं आहे. मुंबईमधील नेहरू तारांगणाचे माजी संचालक व्ही. एस. वेंकटवर्धन यांनी सांगितले की, अपोलो-११ मोहिमेवेळी आणलेल्या नमुन्यांमधील सुमारे १०० ग्रॅम नमुने भारताला मिळाले होते. चंद्राच्या या तुकड्याच्या मदतीने हाय एनर्जीच्या क्षेत्राचा अभ्यास करण्याचं आमचं लक्ष्य होतं. आजही अहमदाबादमधील फिजिकल रिसर्च लॅबमध्ये चंद्राचा एक तुकडा ठेवलेला आहे. मात्र भारताने अमेरिकेकडून मिळालेल्या नमुन्यांपैकी एक तृतियांश नमुने नासाला आधीच परत करण्यात आले आहेत.
पीआरएलचे माजी संचालक जे. एन. गोस्वामी यांनी सांगितले की, चंद्राच्या या तुकड्याला कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत काचेच्या एका कपाटामध्ये सांभाळून ठेवलं जातं. हा तुकडा एका जारमध्ये बंद करून ठेवलेला आहे. त्यावर अधिक चांगलं संशोधन करता यावं म्हणून तो टीआयएफआरमधून इथे आणण्यात आला आहे. गोस्वामी हे भारताची पहिली चंद्र मोहीम असलेल्या चंद्रयान-१ मधील एक संशोधक आहेत.
सर्वसाधारणपणे संशोधनासाठी चंद्राचे जे नमुने नासाकडून घेतले जातात. ते एका ठराविक काळानंतर परत करावे लागतात. मात्र नासाने हा नमुने ठेवून घेण्यासाठी भारताला परवानगी दिली आहे. मात्र त्यासाठी नासाच्या काही कठोर नियमांचं पालन करावं लागतं. कुठलाही संशोधक थेट या नमुन्याला हात लावू शकत नाही. हा नमुना सुरक्षितपणे सांभाळून ठेवण्यात आला आहे. तसेच हा तुकडा ठेवण्यासाठी दर तीन वर्षांनी नासाकडून परवानगी घ्यावी लागते. स्पष्ट शब्दात सांगायचं तर दर तीन वर्षांनी नासाकडून हा नमुना ठेवून घेण्यासाठीच्या परवान्याचं नुतनीकरण करून घ्यावं लागतं. आज भारत चांद्रयान-३ च्या माध्यमातून चंद्रावर उतरणार असेल, तर त्यामध्ये चंद्राच्या या तुकड्याचाही वाटा आहे.