चंद्रयान-3 साठी पुढील काही दिवस महत्वाचे, ३ पैकी २ उद्दिष्टे पूर्ण; इस्त्रोने दिली महत्वाची अपडेट
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2023 08:31 AM2023-08-27T08:31:58+5:302023-08-27T08:33:21+5:30
चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर भारताच्या चंद्रयान ३ ने यशस्वी लँडिंग केले आहे.
भारताच्या चंद्रयान ३ ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी लँडिंग केले. दक्षिण ध्रुवावर पाय ठेवणारा भारत जगातील पहिला देश ठरला आहे. चंद्रयान-3 च्या लँडर विक्रमच्या यशस्वी लँडिंगनंतर, रोव्हर प्रज्ञान चंद्रावरील डेटा गोळा करत आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो रोव्हरच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून आहे. इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांनी शनिवारी महत्वाची माहिती दिली.
इस्रो प्रमुख म्हणाले, "बहुतेक वैज्ञानिक मिशनची उद्दिष्टे आता पूर्ण होणार आहेत. लँडर आणि रोव्हर सर्व कार्यरत आहेत. सर्व वैज्ञानिकांना डेटा खूप चांगला दिसत आहे. येत्आ काही दिवसात आम्ही बराच डेटा गोळा करु शकतो. आम्हाला विज्ञानासाठी खरोखर चांगली प्रगती करण्याची आशा आहे. त्यामुळे आम्ही पुढील १३-१४ दिवसांची वाट पाहत आहोत."
चंद्रयान-3 चे यशस्वी लँडिंग आणि बेंगळुरू येथील इस्रोच्या नियंत्रण केंद्रात पंतप्रधान मोदींचे आगमन झाल्याबद्दल इस्रो प्रमुखांनी आनंद व्यक्त केला. चंद्रयान-3 चे यशस्वी लँडिंग आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शनिवारी झालेल्या दौऱ्यामुळे आम्ही खूप आनंदी आहोत, असंही इस्त्रोचे प्रमुख म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी बेंगळुरूला जाऊन इस्रोच्या शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले. इस्रोच्या मध्यभागी पोहोचल्यानंतर पंतप्रधान मोदी यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. देशाच्या तिसर्या चंद्र मोहिमेतील चंद्रयान-३ मध्ये सहभागी असलेल्या इस्रोच्या शास्त्रज्ञांच्या टीमची त्यांनी भेट घेतली. यासोबतच पीएम मोदींनी महिला शास्त्रज्ञांचीही स्वतंत्रपणे भेट घेतली. चंद्रयान-३ मोहिमेतील महिला शास्त्रज्ञांच्या योगदानाचे त्यांनी कौतुक केले.
तीनपैकी दोन उद्दिष्टे पूर्ण
चंद्रयान-३ ने आपल्या तीनपैकी दोन उद्दिष्टे पूर्ण केली आहेत. ट्विटरवर इस्रोच्या दिलेल्या माहितीनुसार, "चंद्रयान-3 मोहिमेच्या तीन उद्दिष्टांपैकी, चंद्राच्या पृष्ठभागावर सुरक्षित आणि सॉफ्ट लँडिंगचे प्रात्यक्षिक पूर्ण झाले. रोव्हरने रोटेशनचे प्रात्यक्षिक पूर्ण केले. आता इन-सिटू विज्ञान प्रयोग सुरू आहेत. सर्व पेलोड्स सामान्यपणे कार्यरत आहेत.
Chandrayaan-3 Mission:
Of the 3⃣ mission objectives,
🔸Demonstration of a Safe and Soft Landing on the Lunar Surface is accomplished☑️
🔸Demonstration of Rover roving on the moon is accomplished☑️
🔸Conducting in-situ scientific experiments is underway. All payloads are…— ISRO (@isro) August 26, 2023