चंद्रमाेहिमेचे पंचप्राण; राखेतून फिनिक्स भरारी; या पाच शास्त्रज्ञांमुळे झाली माेहीम फत्ते
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2023 06:28 AM2023-08-24T06:28:57+5:302023-08-24T06:29:11+5:30
चंद्रयान-३ मोहीम यशस्वी होणे ही भव्य कामगिरी
बंगळुरू : ६ सप्टेंबर २०१९... चार वर्षांपूर्वीची ही तारीख देशवासीयांसाठी निराशाजनक ठरली. भारताची चंद्रयान-२ माेहीम अपयशी ठरली. एका स्वप्नाची राखरांगाेळी झाली. त्यातून फिनिक्स भरारी घेत चंद्रयान-३ माेहीम यशस्वी झाली. भारताच्या विक्रम लँडरने चंद्रावर पाऊल ठेवले आणि देशाने विक्रम केला. या यशामागे एक फार माेठी टीम कार्यरत हाेती. त्यांचे नेतृत्त्व इस्राेचे अध्यक्ष डाॅ. एस. साेमनाथ यांच्यासह पाच जणांकडे हाेते. हे पाचजण म्हणजे जणू या चंद्रमाेहिमेचे पंचप्राणच हाेते. यू आर राव सॅटेलाईट केंद्राचे संचालक एम. शंकरन, प्रकल्प संचालक पी. वीरमुथ्थुवेल, सहयाेगी प्रकल्प संचालक के. कल्पना, मिशन ऑपरेशन्स संचालक श्रीकांत यांच्याकडे माेहीमेची अतिशय महत्त्वाची जबाबदारी हाेती.
गेल्या चार वर्षांपासून ते फक्त आणि फक्त चंद्रयान माेहीमच जगत हाेते. या काळात त्यांनी कठाेर परिश्रम घेतलेच, शिवाय अनेक पातळ्यांवर टीका-टिप्पणीही सहन करावी लागली. विक्रम लँडर अखेर चंद्रावर उतरले, त्यानंतर त्यांनी आपल्या मनात साचलेल्या शब्दांना वाट माेकळी केली.
चंद्रयान-३ चे यशस्वी सॉफ्टलँडिंग झाल्याची घोषणा इस्रोचे अध्यक्ष डॉ. एस. सोमनाथ यांनी केली. विक्रम लॅंडर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरल्यानंतर सोमनाथ यांनी इस्रोच्या बंगळुरू येथील टेलिमेट्री अँड कमांड सेंटरच्या मिशन ऑपरेशन कॉम्प्लेक्स येथे आपले मनोगत व्यक्त केले. (वृत्तसंस्था)
चंद्रयान-३ मोहीम यशस्वी होणे ही भव्य कामगिरी
या यशात शास्त्रज्ञांचे मोठे योगदान आहे. मोहिमेत त्रुटी राहू नये यासाठी जाणकाराने सूचना केल्या. मोहिमेचे चंद्रयान-१, चंद्रयान-२, असे टप्पे पार पडले होते. चंद्रयान-२ मधील उपकरणे अजूनही कार्यरत आहेत. हा टप्पा पूर्ण करताना त्याआधी चंद्रयान-१, चंद्रयान-२ या टप्प्यांसाठी उत्तम कामगिरी बजावलेल्या सर्वांचे आभार आणि अभिनंदन.- डॉ. एस. सोमनाथ, अध्यक्ष, इस्रो
एम. शंकरन : माेहिमेचा तिसरा डाेळा
चंद्रयान तसेच ‘इस्राे’साठी उपग्रह बनविणाची जबाबदारी यू आर राव सॅटेलाईट केंद्राचे संचालक एम. शंकरन यांच्या पथकाकडे आहे. एका अर्थाने ते इस्राेचे ‘पाॅवरहाऊस’ आहेत. उपग्रहासाठी लागणाऱ्या अत्यावश्यक अशा साैरबॅटरी, नेव्हिगेशन, सेन्सर्स आदी यंत्रणेची जबाबदारी त्यांच्याकडेच हाेती. चंद्रयान-१, चंद्रयान-२ आणि मंगळयान माेहिमेत त्यांचा वाटा हाेता. चंद्रयान-३ च्या उपग्रहाची उष्ण आणि थंड चाचणी पार पाडण्याची जबाबदारी त्यांची हाेती. चंद्राच्या पृष्ठभागाचा तंताेतंत नमुना त्यांनी तयार करून दिला. त्यामुळेच विक्रम लँडरच्या क्षमतेची चाचणी घेता आली.
पंतप्रधानांचा साेमनाथांना फाेन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डाॅ. एस. सोमनाथ यांना फाेन केला आणि म्हणाले की, सोमनाथजी आपले नावही चंद्राशी संबंधितच आहे. इस्रोच्या सर्व टीमने चंद्रयान-३ मोहिमेत इतके भव्य यश मिळविले त्याबद्दल त्यांचे व त्यांच्या कुटुंबीयांचेही मी अभिनंदन करत आहे. मी लवकरच शास्त्रज्ञांची प्रत्यक्ष भेट घेऊन पुन्हा अभिनंदन करणार आहे.
‘टार्गेट ऑन स्पॉट’
हा अतिशय आनंदाचा क्षण आहे. या प्रकल्पाचा संचालक म्हणून मला अतिशय आनंद आहे. संपूर्ण माेहिमेतील प्रत्येक टप्पा लाॅंचिंगपासून लॅंडिगपर्यंत टाईमलाईननुसार काेणत्याही अडचणीविना यशस्वीरीत्या पार पडला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत पहिला देश ठरला आहे. लँडर उतरले ते टार्गेट ऑन स्पाॅट हाेते. यासाठी सर्व पथकांचे मी अभिनंदन करताे आणि आभार मानताे.- पी. वीरामुथ्थुवेल, प्रकल्प संचालक
अपयशातून शिकल्या कल्पना
कल्पना या चंद्रयान-२ माेहिमेतही सहभागी हाेत्या. याशिवाय त्यांनी मंगळयान माेहिमेच्या यशातही माेलाचे याेगदान दिले हाेते. काेराेना काळातही त्यांनी त्यांच्या टीमला कायम प्राेत्साहित केले. लॅंडर सिस्टीमची जुळवणी व रचना करण्यामागे त्यांची भूमिका फार महत्त्वाची हाेती. त्यामुळे माेहिमेतील आव्हानांवर मात करता आली.
२०१९मध्ये जे आपण साध्य करायचे हाेते, ते आपण आज साध्य केले. चंद्रयान-३ लाॅंच झाल्यानंतर अंतराळयान राॅकेटपासून वेगळे झाले, त्यानंतर लॅंडर यशस्वीरीत्या चंद्रावर उतरल्यानंतरच मी बाेलणार, असे ठरविले हाेते. प्रकल्पाचा चेहरा असलेले संचालक आणि सहयाेगी संचालक यांच्या गेल्या ४ वर्षांपासून प्रत्येकाचे अन्न, श्वास, झोप हे चंद्रयान हेच बनले हाेते. या लाेकांनी प्रचंड टीका सहन केली. आता चंद्रावर मानव व शुक्रावर यान पाठविणे आणि मंगळावर यान उतरविणे, हे साध्य करायचे आहे.- कल्पना
चंद्रयान-३च्या टीममधील प्रत्येकासाठी हा सर्वाधिक आनंदाचा आणि संस्मरणीय क्षण ठरणार आहे. आपण आपले उद्दीष्ट काेणत्याही अडचणीविना साध्य केले आहे. संपूर्ण माेहिमेची नव्याने उभारणी, विशेष चाचण्या इत्यादी अतिशय काटेकाेरपणे करण्यात आल्या. चंद्रयान-२च्या अनुभवानंतर अंतराळयान उभारण्यास घेतले, त्या दिवसापासून ही माेहीम आमच्या टीमसाठी श्वास बनली हाेती. आपल्या चंद्रयान-३ टीमच्या सदस्यांच्या कठाेर परिश्रमाशिवाय हे साध्य हाेणे अशक्यच हाेते.