लँडिंगसाठी चंद्राचा दक्षिण ध्रुव का निवडला? चंद्रयान-3 बाबत ISRO प्रमुखांनी दिली मोठी माहिती...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2023 05:40 PM2023-08-24T17:40:10+5:302023-08-24T17:40:31+5:30
Chandrayaan 3: ISRO ने चंद्रयान-3 ला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर का उतरवले? पाहा एस. सोमनाथ काय सांगतात...
Chandrayaan 3:भारताची महत्त्वाकांक्षी चंद्र मोहीम यशस्वी ठरली. बुधवारी(दि.23) संध्याकाळी 6 वाजता चंद्रयान-3 चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीरित्या उतरले. भारतीय अंतराळ संस्था ISRO ने अनेक अडथळे आणि अडचणींना तोंड देत देशाला जागतीक स्पेस क्लबमध्ये आणले. या लँडिंगसह चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ यान उतरवणारा भारत जगातील पहिला देश ठरला आहे. याच भागावर यान उतरण्याचा रशियाचा प्रयत्न रविवारी(दि.20) इंजिनमध्ये बिघाड झाल्याने अयशस्वी झाला.
चंद्रयान-3 साठी नव्याने सुरुवात
चंद्राच्या पृष्ठभागावर अवकाशयान उतरवण्याचा भारताचा हा तिसरा प्रयत्न होता. मागील चंद्रयान-2 चे लँडर 2 सप्टेंबर 2019 रोजी उतरतेवेळी क्रॅश झाले होते. दरम्यान, या यशाबद्दल भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) प्रमुख एस. सोमनाथ यांनी सांगितले की, चंद्रयान-2 ची हार्ड लँडिंग झाल्यामुळे सर्व उपकरणे नष्ट झाली होती. चंद्रयान-3 साठी सर्वकाही नव्याने तयार करावे लागले.
एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत एस सोमनाथ यांनी या मोहिमेतील आव्हाने आणि याचे उद्दिष्ट सांगितले. ते म्हणाले की, "आम्हाला या मोहिमेसाठी सर्व गोष्टी नव्याने सुरू कराव्या लागल्या. चंद्राच्या पृष्ठभागावर कोसळलेल्या चंद्रयान-2 चे कोणतेही उपकरण सुरू करणे शक्य नव्हते. चंद्रयान-2 अयशस्वी झाल्यानंतर आमचे पहिले वर्ष त्यात झालेली चूक शोधण्यात गेले."
"नंतर पुढच्या वर्षी आम्ही चंद्रयान-3 साठी नव्याने सुरुवात केली. गेल्या 2 वर्षांपासून आम्ही अनेक चाचण्या केल्या. कोविड-19 महामारीमुळे इस्रोला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. कोरोनाने आमच्या काही कार्यक्रमांमध्ये व्यत्यय आणला, पण तरीही आम्ही काही रॉकेट लाँच केले. कोव्हिडनंतर आम्ही पुन्हा मार्गावर आलो."
चंद्रयान-3 द्वारे काय साध्य होणार?
ते म्हणाले की, "चंद्रयान 3 चे यश खूप खास आहे, कारण आतापर्यंत इतर कोणतेही अंतराळ यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ सॉफ्ट लँडिंग करू शकले नाही. चंद्राचा दक्षिण ध्रुव मोठ-मोठे खड्डे आणि खोल दऱ्यांनी भरलेला आहे. त्यामुळे इथे यान उतरवण्याचे मोठे आव्हान होते. चंद्रयान-3 मोहिमेद्वारे चंद्रावरील बर्फाचा अभ्यास केला जाईल आणि यातून संभाव्य अस्तित्वाबद्दलची माहिती मिळेल."
"सहा चाकी रोव्हर पुढील 14 दिवस चंद्राच्या पृष्ठभागावर विविध प्रयोग करणार आहे. विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरचे मिशन लाइफ चंद्रावर फक्त 1 दिवस आहे, जे पृथ्वीवरील 14 दिवसांच्या बरोबरीचे आहे. चंद्रावरील विशिष्ट कामांसाठी या लँडर मॉड्यूलमध्ये पाच पेलोड पाठवण्यात आले आहेत. चंद्रयान 3 द्वारे दक्षिण ध्रुवावरील पाणी/बर्फ आणि मौल्यवान खनिजांची माहिती मिळेल," अशी माहिती सोमनाथ यांनी दिली.