Video: 'इस्रो' कार्यालयात जल्लोष, PM मोदींनी वाजवल्या टाळ्या; देशभरात आनंदी आनंद
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2023 06:20 PM2023-08-23T18:20:57+5:302023-08-23T18:46:53+5:30
देशावासीयांसह जगाचे लक्ष लागलेल्या चांद्रयान ३ मोहिमेचं मिशन यशस्वी झालं आहे.
नवी दिल्ली - भारत आणि इस्रोच्या अंतराळ संशोधनाच्या इतिहासातील ऐतिहासिक क्षण अखेर आज सत्यात उतरला. भारतीय संतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोच्या महत्त्वाकांक्षी चंद्रमोहिमेतील चांद्रयान-३ ने आज मोठे यश मिळवले. चांद्रयान-३ मधील विक्रम हा लँडर आज नियोजित वेळेनुसार संध्याकाळी सहा वाजून ४ मिनिटांनी चंद्राच्या पृष्टभागावर सुरक्षितरीत्या उतरला आणि इस्रोच्या शास्त्रज्ञांसह कोट्यवधी भारतीयांनी एकच जल्लोष केला. पंतप्रधाननरेंद्र मोदींनीही टाळ्या वाजवून आणि तिरंगा फडकवत या क्षणाचा आनंद साजरा केला.
देशावासीयांसह जगाचे लक्ष लागलेल्या चांद्रयान ३ मोहिमेचं मिशन यशस्वी झालं आहे. चांद्रयान ३ चे आज चंद्रावर सॉफ्ट लँडींग झालं. सायंकाळी ६.०४ वाजता चांद्रयान दक्षिण ध्रुवावर उतरलं आणि देशवासीयांचा उर अभिमानाने भरुन आला. इस्रोच्या कार्यालयासह देशभरात लाईव्ह प्रक्षेपण पाहणाऱ्या सर्वांनीच टाळ्या वाजवून आनंद साजरा केला. इस्रो कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी टाळ्या वाजवून दोन्ही हात वर करुन हा क्षण साजरा केला. यावेळी, इस्रोचे प्रमुख सोमनाथन यांनीही आनंद व्यक्त केला.
पंतप्रधाननरेंद्र मोदी सध्या ब्रिक्स परिषदेसाठी द. आफ्रिकेत आहेत. मोदी तेथूनच ह्या क्षणाचे साक्षीदार झाले आणि टाळ्या वाजवून दाद दिली. यावेळी, त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. त्यानंतर तिरंगा ध्वज फडकावत मोदींनी चांद्रयान मोहिमेच्या यशस्वीतेचा क्षण साजरा केला. देशवासीयांना या मोहिमेच्या यशस्वीतेचा अत्यानंद झाल्याचंही सोशल मीडियातून पाहायला मिळत आहे.
#WATCH भारतीय अंतरिक्ष अनुसंधान संगठन (इसरो) का तीसरा चंद्र मिशन चंद्रयान-3 चंद्रमा पर सॉफ्ट लैंडिंग किया। pic.twitter.com/DoaTafMaIs
— ANI_HindiNews (@AHindinews) August 23, 2023
चांद्रयान २ च्या अपयशामुळे धाकधूक
२०१९ साली भारताच्या चांद्रयान-२ या मोहिमेत अंतिम क्षणी अपयश आल्याने इस्त्रोसह देशवासियांची निराशा झाली होती. मात्र या अपयशाने खचून न जाता इस्रोच्या शास्त्रज्ञांनी अधिक जोमाने प्रयत्न करत चांद्रयान-३ मोहिमेची आखणी केली होती.
दरम्यान, १४ जुलै २०२३ रोजी चांद्रयान-३ हे यशस्वीरीत्या चंद्राच्या दिशेने झेपावले होते. त्यानंतर एकएक टप्पा पार करत हे या चांद्रयान-३ चंद्राच्या कक्षेत दाखल झाले होते. अखेर आज संध्याकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी चांद्रयान-३ मधील विक्रम लँडर अलगदपणे चंद्राच्या पृष्टभागाच्या दिशेने झेप घेत चंद्राच्या पृष्टभागावर यशस्वीरीत्या उतरला. त्याबरोबरच एक नवा इतिहास रचला गेला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडर उतरवणारा भारत हा पहिला देश ठरला आहे. तर चंद्रावर यान उतरवण्यात यश मिळवणारा रशिया, अमेरिका, चीन या देशांनंतरचा चौथा देश ठरला आहे.