भारताचे चंद्रयान अजूनही जिवंत, इतरांना मदत करणार, लँडरने ‘लोकेशन मार्कर’ म्हणून काम केले सुरू...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2024 12:28 PM2024-01-20T12:28:40+5:302024-01-20T12:29:10+5:30
‘इस्रो’ने निवेदनात म्हटले आहे की, ‘चंद्रयान-३’ लँडरवर स्थापित ‘लेझर रेट्रोरिफ्लेक्टर ॲरे’ने (एलआरए) कार्य सुरु केले आहे.
बंगळुरू : चंद्रावर पोहोचलेल्या ‘चंद्रयान-३’ लँडरच्या एका उपकरणाने चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ ‘लोकेशन मार्कर’ म्हणून काम करण्यास सुरुवात केल्याची माहिती भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) शुक्रवारी दिली.
‘इस्रो’ने निवेदनात म्हटले आहे की, ‘चंद्रयान-३’ लँडरवर स्थापित ‘लेझर रेट्रोरिफ्लेक्टर ॲरे’ने (एलआरए) कार्य सुरु केले आहे. अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्था नासाच्या ‘लूनार रेकॉनासन्स ऑर्बिटर’ने (एलआरओ) १२ डिसेंबर २०२३ रोजी परावर्तीत संदेश यशस्वीरीत्या शोधून काढले आणि लेझर श्रेणी मापन साध्य केले, असे निवेदनात म्हटले आहे.
‘नासा’च्या एलआरएला सामावून घेतले...
‘एलआरओवर लूनार ऑर्बिटर लेसर अल्टिमीटरचा (एलओएलए) वापर करण्यात आला. चंद्राच्या पूर्वेकडे एलआरओ सरकत असताना रात्रीच्या वेळी हे निरीक्षण करण्यात आले. नासाच्या एलआरएला आंतरराष्ट्रीय सहकार्याचा भाग म्हणून ‘चंद्रयान-३’ विक्रम लँडरवर सामावून घेण्यात आले.
२० ग्रॅमचे उपकरण
एलआरएमध्ये अर्धगोलाकार संरचनेवर अष्टकोनी घन प्रतिक्षेपक असतात. हे योग्य उपकरणांसह अवकाशयानाची परिक्रमा करून वेगवेगळ्या दिशांनी लेझर सुविधा प्रदान करते. सुमारे २० ग्रॅम वजनाचे ऑप्टिकल उपकरण अनेक दशके टिकून राहील.
दक्षिण ध्रुवावरील एकमेव एलआरए
‘इस्रो’ने सांगितले की, ‘चंद्रयान-३’चे विक्रम लँडर, जे २३ ऑगस्ट २०२३ रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ उतरले व तेव्हापासून एलओएलएच्या संपर्कात आले आहे. चंद्राच्या शोधाच्या सुरुवातीपासून अनेक एलआरए चंद्रावर तैनात केले गेले आहेत. ‘चंद्रयान-३’ वरील एलआरए ही छोटी आवृत्ती आहे. दक्षिण ध्रुवाजवळ सध्या हे एकमेव एलआरए उपलब्ध आहे.
फायदा काय?
‘चंद्रयान-३’च्या विक्रम लँडरवरील ‘नासा’चे एलआरए दीर्घकालीन ‘जिओडेटिक स्टेशन’ (चंद्राचा भौमितिक आकार, अंतराळातील अभिमुखता आणि गुरुत्वाकर्षण क्षेत्र यांचे मोजमाप घेण्याचे काम करणारे स्थानक) आणि चंद्राच्या पृष्ठभागावर ‘लोकेशन मार्क‘ म्हणून काम करत राहील. त्यामुळे वर्तमान आणि भविष्यातील चंद्र मोहिमांना फायदा होईल, असे ‘इस्रो’ने म्हटले आहे.
या मोजमापामुळे अवकाशयानाची परिभ्रमण स्थिती अचूकपणे निर्धारित करण्यात मदत होईल. याशिवाय चंद्राची गतिशीलता, अंतर्गत रचना आणि गुरुत्वाकर्षणाच्या विसंगतींशी संबंधित माहिती उपलब्ध होईल