चांद्रयान-३चं लँडिंग यशस्वी,आता पुढील काही तास महत्वाचे; काय आहे नेमकी प्रक्रिया? जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2023 09:29 PM2023-08-23T21:29:01+5:302023-08-23T21:30:06+5:30
पृथ्वीवरील १४ दिवस म्हणजे चंद्रावरील १ दिवस आहे.
नवी दिल्ली: भारत आणि इस्रोच्या अंतराळ संशोधनाच्या इतिहासातील ऐतिहासिक क्षण अखेर आज सत्यात उतरला. भारतीय संतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोच्या महत्त्वाकांक्षी चंद्रमोहिमेतील चांद्रयान-३ ने आज मोठे यश मिळवले. चांद्रयान-३ मधील विक्रम हा लँडर आज नियोजित वेळेनुसार संध्याकाळी ०६ वाजून ४ मिनिटांनी चंद्राच्या पृष्टभागावर सुरक्षितरीत्या उतरला आणि इस्रोच्या शास्त्रज्ञांसह कोट्यवधी भारतीयांनी एकच जल्लोष केला.
इस्रोचे चांद्रयान-३ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरित्या उतरले तर आहे, मात्र आता पुढील काही तास भारतासाठी महत्त्वाचे आहेत. विक्रम हा लँडर आहे, जो चंद्रावर लँड केलेय, त्यातून रोव्हर वेगळा होईल. त्यानंतर प्रज्ञान रोव्हर चंद्रावर फिरेल अन् तेथील डेटा इस्रोला पाठवेल. विक्रमच्या यशस्वी लँडिंगनंतर प्रज्ञान रोव्हर आपले काम सुरु करेल. रोव्हर प्रज्ञान पुढील ३-४ तासांत विक्रम लँडरमधून बाहेर येईल. पृथ्वीवरील १४ दिवस म्हणजे चंद्रावरील १ दिवस आहे. विशेष म्हणजे, बॅटरी चार्ज करून रोव्हर सुरु ठेवण्याचा इस्रो प्रयत्न करणार आहे. हे यशस्वी झाल्यास, पुढील १४ दिवसांसाठी रोव्हर वापरता येईल, जेव्हा चंद्राच्या पृष्ठभागावर पुढील सूर्योदय सुरू होईल.
चांद्रयान-३ने चंद्रावर सॉफ्ट लँडिंग केल्यानंतर एक संदेश पाठवला आहे. "मी यशस्वीपणे चंद्रावर पोहोचलो, आणि माझ्यासोबत संपूर्ण भारत याठिकाणी पोहोचला आहे"; असा आशयाचा संदेश चांद्रयानाने पाठवला आहे. इस्रोने पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे. त्यानंतर आता चांद्रयान-३ने चंद्रावर पोहताच पहिला फोटो पाठवला आहे. या फोटोमध्ये चंद्रावरील दक्षिण ध्रुवाचा भाग कसा दिसतो, हे या फोटोमधून स्पष्ट होत आहे. इस्रोने ट्विट करत ही माहिती दिली आहे.
Chandrayaan-3 Mission:
— ISRO (@isro) August 23, 2023
Updates:
The communication link is established between the Ch-3 Lander and MOX-ISTRAC, Bengaluru.
Here are the images from the Lander Horizontal Velocity Camera taken during the descent. #Chandrayaan_3#Ch3pic.twitter.com/ctjpxZmbom
दरम्यान, १४ जुलै २०२३ रोजी चांद्रयान-३ हे यशस्वीरीत्या चंद्राच्या दिशेने झेपावले होते. त्यानंतर एकएक टप्पा पार करत हे या चांद्रयान-३ चंद्राच्या कक्षेत दाखल झाले होते. अखेर आज संध्याकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी चांद्रयान-३ मधील विक्रम लँडर अलगदपणे चंद्राच्या पृष्टभागाच्या दिशेने झेप घेत चंद्राच्या पृष्टभागावर यशस्वीरीत्या उतरला. त्याबरोबरच एक नवा इतिहास रचला गेला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडर उतरवणारा भारत हा पहिला देश ठरला आहे. तर चंद्रावर यान उतरवण्यात यश मिळवणारा रशिया, अमेरिका, चीन या देशांनंतरचा चौथा देश ठरला आहे.