चंद्रयान-3 च्या लँडिंगसाठी २३ तारीखच का निवडली? काय आहे कारण जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2023 10:09 AM2023-08-23T10:09:05+5:302023-08-23T10:09:35+5:30
जर भारताने चंद्रावर यशस्वी लँडिंग केले तर भारत असे करणारा जगातील चौथा आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा पहिला देश बनेल.
भारतासाठी आजचा दिवस महत्वाचा असणार आहे, चंद्रयान 3 आज इतिहास रचणार आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने म्हटले आहे की, चंद्रयान-3 मोहीम वेळापत्रकानुसार आहे आणि आज बुधवारी सायंकाळी चंद्राच्या दक्षिण ध्रुवीय प्रदेशावर सॉफ्ट लँडिंगसाठी सुरळीतपणे प्रगती करत आहे. चंद्रावर उतरल्यानंतर, भारत असे करणारा जगातील चौथा आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा पहिला देश बनेल. यापूर्वी अमेरिका, रशिया आणि चीनने ऐतिहासिक कामगिरी केली आहे.
चंद्रावर भारत जिंकणार! चंद्रयान 3 च्या सॉफ्ट लँडिंगसाठी 'ही' मोठी आव्हाने असणार
विक्रम लँडर मॉड्यूलचे सॉफ्ट लँडिंग म्हणजे ६००० किमी प्रतितास वेग शून्यावर आणणे. यादरम्यान विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर ९० अंश उभ्या स्थितीत उतरेल.
२३ ऑगस्ट हा दिवस का निवडला?
चंद्रावर १४ दिवसांचा दिवस आणि १४ दिवसांची रात्र असते. सध्या चंद्रावर रात्र आहे आणि २३ तारखेला सूर्योदय होणार आहे. लँडर विक्रम आणि रोव्हर प्रज्ञान हे दोन्ही सौर पॅनेल वापरून ऊर्जा मिळवू शकतील.
लँडर सध्या चंद्राच्या कक्षेत क्षैतिजरित्या फिरत आहे. लँडिंगपूर्वी ते ९० अंशांवर सरळ केले जाईल. रॉकेट पृथ्वीवरून ज्या प्रकारे उड्डाण केले त्याच प्रकारे लँडर चंद्रावर उतरणार आहे.
इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रयान-3 चे सर्व सेन्सर निकामी झाले तरी ते लँडिंग करेल. दोन्ही इंजिन बंद असतानाही ते उतरण्यास सक्षम असेल, असं हे डिझाइन केले आहे.
चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर असलेले खड्डे नेहमीच गडद असतात. सॉफ्ट लँडिंगची प्रक्रिया ३० किमी उंचीवरून सुरू होईल. यादरम्यान लँडरचा वेग नियंत्रित करणे हे मोठे आव्हान असेल.
इस्रोच्या माहितीनुसार, लँडिंगपूर्वी सुरक्षित आणि धोकामुक्त क्षेत्र शोधण्यासाठी लँडिंग साइटचे इमेजिंग केले जाईल. लँडर चंद्राच्या दिशेने क्षैतिज स्थितीत उतरेल आणि ISRO टेलिमेट्री, ट्रॅकिंग आणि कमांड नेटवर्क, बेंगळुरू येथील MOX शास्त्रज्ञ कमांड तैनात करतील. लँडरची स्थिती उभ्यामध्ये बदलली जाईल आणि त्या स्थितीत ते चंद्रावर फिरेल, फोटो घेईल, लँडिंग क्षेत्राचे सर्वेक्षण करेल आणि सुरक्षित लँडिंग साइट ठरवेल.
अडचणी आल्यास लांबणीवर
लँडिंगवेळी काही तांत्रिक अडचणी आल्यास लँडिंगची वेळ बदलण्यात येऊ शकते. इस्त्रोकडून विक्रम लँडर वरील यंत्रणेची रोज तपासणी सुरू आहे. सध्यातरी सर्व काही सुरळीत असल्याची माहिती इस्त्रोकडून देण्यात आली.