चंद्रावर उतरणार रंभा! पृष्ठभागावरील माती, वातावरणाचा करणार सखोल अभ्यास

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2023 05:54 AM2023-07-15T05:54:14+5:302023-07-15T05:54:52+5:30

लँडरवरील रंभा उपकरण चंद्राच्या पृष्ठभागाजवळील प्लाझ्मा घनता व विविध वेळांना तिच्यात होणारे बदल याचा अभ्यास करणार आहे.

Chandrayaan 3: The Chandrayaan-3 mission will also pave the way for future missions to be planned by India to study various planets | चंद्रावर उतरणार रंभा! पृष्ठभागावरील माती, वातावरणाचा करणार सखोल अभ्यास

चंद्रावर उतरणार रंभा! पृष्ठभागावरील माती, वातावरणाचा करणार सखोल अभ्यास

googlenewsNext

नवी दिल्ली - चंद्रयान-३ मोहिमेमुळे विविध ग्रहांचा अभ्यास करण्यासाठी भारत आखणार असणाऱ्या भावी मोहिमांचा मार्गही सुकर होणार आहे. चंद्रयान-३ सोबत असलेल्या रंभा, इस्ला आदी सहा शास्त्रीय उपकरणांमुळे इस्रोला चंद्रावरील मातीच्या वैशिष्ट्यांचा सखोल अभ्यास करता येणार आहे, तसेच चंद्राच्या कक्षेतून पृथ्वीची छायाचित्रे टिपता येणार आहेत. 

चंद्रयान-३वरील रंभा व इल्सा ही उपकरणे १४ दिवसांच्या मोहिमेत विविध प्रयोग करणार आहेत. चंद्रावरील वातावरणाचा व त्या ग्रहाच्या पृष्ठभागाच्या पोटात असलेल्या खनिजांचा अभ्यास केला जाईल. लुनार लँडर विक्रम हा प्रज्ञान रोव्हरची छायाचित्रे टिपणार आहे. प्रज्ञान रोव्हर काही उपकरणांच्या आधारे चंद्रावरील भूकंपविषयक हालचालींचा अभ्यास करणार आहे. त्यासाठी लेझर किरणांचा वापर करून चंद्राच्या पृष्ठभागावरील एखादा तुकडा वितळवण्याचा प्रयत्न केला जाईल. रेगोलिथ प्रक्रियेदरम्यान उत्सर्जित होणाऱ्या वायूंचा अभ्यास या प्रयोगांदरम्यान केला जाणार आहे. इस्रोचे अध्यक्ष एस, सोमनाथ म्हणाले की, चंद्रावर कोणतेही वातावरण नाही असे सांगितले जाते. पण, ते तितकेसे खरे नाही. त्याच्या वातावरणातून वायू उत्सर्जित होतात. त्या वायूचा थर पृष्ठभागाच्या अगदी जवळ असतो. या गोष्टींचाही अभ्यास करण्यात येणार आहे. 

पृष्ठभागाजवळील प्लाझ्मा घनता आणि होणाऱ्या बदलांवर नजर
रेडिओ ॲनॅटॉमी ऑफ मून बाउंड हायपरसेन्सिटिव्ह आयनोस्फिअर अँड ॲटमोस्फिअर असे एका उपकरणाचे नाव  आहे. त्याचे लघुरूप रंभा असे आहे. लँडरवरील रंभा उपकरण चंद्राच्या पृष्ठभागाजवळील प्लाझ्मा घनता व विविध वेळांना तिच्यात होणारे बदल याचा अभ्यास करणार आहे. चंद्रावरील स्मॉल ॲटमॉस्फिअर, ॲटोमिक ॲटमॉस्फिअर, चार्ज्ड पार्टिकल्स या गोष्टींचे रोव्हर निरीक्षण करणार आहे. 

चंद्रावरील माती, दगडाचाही होणार अभ्यास
लेझर बेस्ड् ब्रेकडाऊन स्पेक्ट्रोस्कोप (लिब्ज) हे उपकरण चंद्रावरील माती, दगड यांचा अभ्यास करणार आहे. अल्फा पार्टिकल एक्स-रे स्पेक्ट्रोमीटर चंद्राच्या पृष्ठभागावरील रासायनिक प्रक्रिया, खनिजांचे अस्तित्व अशा गोष्टींची तपासणी करणार आहे. स्पेक्ट्रो पोलरिमेंट्री ऑफ हॅबिटेबल प्लॅनेट अर्थ (शेप) हे उपकरण पृथ्वीच्या स्पेक्ट्रो-पोलारिमेट्रिक सिग्नेचरचा चंद्राच्या कक्षेतून अभ्यास करणार आहे. चंद्रावर उतरविण्यात येणारे लँडर तिथे १४ दिवस असणार आहे. त्या कालावधीत अनेक प्रयोग करण्यात येतील.

चंद्रावर रात्री उणे २३२ अंश सेल्सिअसपर्यंत तापमान
चंद्रावर रात्री उणे २३२ अंश सेल्सिअसपर्यंत तापमान असते. तिथे १४ दिवस खूप कमी तापमानात कार्यरत असताना रोव्हरमधील उपकरणे नीट सुरू राहिली तर त्यामुळे स्पेसक्राफ्टचे आयुष्य वाढणार आहे, असे इस्रोच्या शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.

नवीन काय? 

  • यावेळी लँडरला नवीन डोळे मिळाले, असे म्हटले तरी हरकत नाही.
  • लँडरचे पाय (लेग्ज) अधिक मजबूत करण्यात आले.
  • लँडर ३ मीटर प्रति सेकंद पर्यंतच्या वेगाने चंद्रावर लँड करण्यास सक्षम
  • लँडरच्या चारी बाजूंनी सौर पॅनेल लावण्यात आले आहेत. त्यामुळे ऊर्जा तयार करण्यास कोणतीही अडचण नाही.
  • सॉफ्टवेअर पूर्वीपेक्षा अधिक उत्तम, अल्गोरिदममध्येही सुधारणा
  • अधिक सेन्सर लावण्यात आले. लेझर डॉप्लर व्हेलॉसिटी मीटर हा लँडरचा डोळा म्हणूनही काम करतो.
  • लँडरमध्ये यावेळी पूर्वीपेक्षा अधिक इंधन, संकटात स्वत:ला सांभाळू शकतो.
  • यावेळी लँडिंग साइट खूपच मोठी आहे, ४ किमी (सरळ ट्रॅक) x २.५ किमी (रुंदी) लँडिंग साइट.
  • सिम्युलेशन आणि चाचणीवर अधिक जोर देण्यात आला. प्रत्येक प्रणाली आणि लँडिंगशी संबंधित प्रत्येक प्रक्रियेची चाचणी घेण्यात आली.
  • मार्गामध्ये चढ-उतारात स्वत:ला सावरण्याची क्षमता
  • सॉफ्टवेअरमध्ये चुका झाल्या तरीही अधिक पर्याय
  • चंद्रयान-२ च्या लँडरपेक्षा जवळपास २५० किलो जास्त.

Web Title: Chandrayaan 3: The Chandrayaan-3 mission will also pave the way for future missions to be planned by India to study various planets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.